बालकुमार मेळाव्यात रंगणार कथा, कवितांसह बालसाहित्यिकांशी गप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:29 AM2021-02-21T04:29:14+5:302021-02-21T04:29:14+5:30
नाशिक : साहित्य संमेलनात प्रथमच होणाऱ्या बालकुमार मेळाव्यात बालकवी कट्टा, बालकथा कट्टा, परिसंवाद व प्रथितयश बालसाहित्यिकांशी गप्पा-गोष्टी ...
नाशिक : साहित्य संमेलनात प्रथमच होणाऱ्या बालकुमार मेळाव्यात बालकवी कट्टा, बालकथा कट्टा, परिसंवाद व प्रथितयश बालसाहित्यिकांशी गप्पा-गोष्टी अशा साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. शनिवारच्या बैठकीत या मेळाव्यासाठी संभाव्य निमंत्रित प्रथितयश साहित्यिकांच्या नावांची चर्चा करण्यात आली असून हा मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
संमेलन प्रारंभाच्या ९३ वर्षानंतर प्रथमच बालसाहित्याला या संमेलनात समाविष्ट करून घेतले जाणार असल्याने बालकुमार मेळावा अधिक देखणा व यशस्वी व्हावा यासाठी नाशिक जिल्ह्यातील साहित्य व सांस्कृतिक प्रांतातील नामवंत व्यक्तींचा समितीत समावेश आहे. या बालमेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने मुलांची उपस्थिती अपेक्षित असल्याने अनेक मान्यवर सदस्यांच्या सकारात्मक सूचनांचे स्वागत करण्यात आले. परिसंवाद व गप्पागोष्टी या कार्यक्रमात अंतिमतः सहभागी असणाऱ्या ज्येष्ठ बालसाहित्यिकांची नावे लवकरच निश्चित केली जाणार आहेत. बालकुमार मेळाव्याचे नियोजन अत्यंत चोख व समाधानकारक असल्याचा विश्वास समितीचे प्रमुख संतोष हुदलीकर यांनी व्यक्त केला. बालकुमार मेळाव्यात जास्तीत जास्त मुलांचा आणि बालसाहित्यिकांचा सहभाग वाढण्याच्या दृष्टीने कल्पक सूचना नाशिककरांनी कराव्यात, असेही आवाहन करण्यात आले आहे.
इन्फो
स्टॉल्स संख्येबाबत निर्बंध
नाशिकची कनेक्टिव्हिटी तसेच नाशिकला येणाऱ्या रसिक वाचकांची संख्या विदर्भ, मराठवाड्यातील संमेलनांपेक्षा अधिक राहण्याची शक्यता गृहीत धरली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पुस्तकांच्या स्टॉल्सना वाढता प्रतिसाद मिळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कुणी एकाच व्यक्तीने जादा किंवा अतिरिक्त स्टॉल्स घेऊन त्यांची चढ्या दराने विक्री करू नये म्हणून प्रत्येक संस्थेला, प्रकाशकांना केवळ ४ स्टॉल्स देण्याचे निर्बंध घालण्यात आले आहेत.
लोगो
साहित्य संमेलनाचा लोगो वापरावा.