वादळाने पेठ तालुक्यात लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 00:38 IST2021-05-18T20:28:04+5:302021-05-19T00:38:23+5:30
पेठ : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताउते या चक्रीवादळाने गुजरातकडे मार्गक्रमण करत असताना, किनारपट्टीलगत असलेल्या पेठ तालुक्याला मात्र चांगलेच झोडपून काढले. यामध्ये राहत्या घरांसह शासकीय इमारती व आंबा फळपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, ऐन कोरोना काळात अवकाळीचे संकट आल्याने आदिवासी शेतकरी मात्र मेटाकुटीला आला आहेत.

पेठ तालुक्यातील ससुणे येथे वादळाने झालेले घराचे नुकसान.
पेठ : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताउते या चक्रीवादळाने गुजरातकडे मार्गक्रमण करत असताना, किनारपट्टीलगत असलेल्या पेठ तालुक्याला मात्र चांगलेच झोडपून काढले. यामध्ये राहत्या घरांसह शासकीय इमारती व आंबा फळपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, ऐन कोरोना काळात अवकाळीचे संकट आल्याने आदिवासी शेतकरी मात्र मेटाकुटीला आला आहेत.
२०५ हेक्टर आंबा भुईसपाट
पेठ तालुक्यात गत पाच दहा वर्षांपासून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून, शेतकरी केशर, हापूस, राजापुरी या अधिक उत्पादन देणाऱ्या आंबा फळांचे उत्पादन घेऊ लागले आहेत. याही वर्षी कोरोना व लॉकडाऊन यामुळे हाताला काम नसल्याने किमान आंब्याच्या विक्रीतून तरी घरखर्च भागविला जाईल, अशी आशा असताना ऐन पक्वतेत आलेला आंबा भुईसपाट झाल्याने शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
तालुका कृषी विभागाच्या अहवालानुसार ९३ गावांतील १,४८० शेतकऱ्यांच्या २०५ हेक्टर क्षेत्रातील आंबा पिकाचे नुकसान झाले असून, तालुकास्तरीय यंत्रणेला पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी सांगितले.
घरांसह शासकीय इमारतींची पडझड
वादळामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये राहत्या घरांची पडझड झाल्याने कौले, लाकडे व संसारोपयोगी सामानाचे नुकसान झाले, तर हरणगाव, आसरबारी, आमडोंगरा, धुळघाट आदी गावांतील शाळा व शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे. पावसाचे प्रमाण कमी असले, तरी प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे नुकसानीची तीव्रता अधिक जाणवली आहे. तालुक्यातील ६५ घरांचे वादळात अंशतः नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार संदीप भोसले यांनी दिली.