वादळाने पाच लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2016 11:31 PM2016-05-09T23:31:18+5:302016-05-09T23:33:31+5:30
शिंदेवाडी : शेडनेट उद्ध्वस्त
सिन्नर : तालुक्यातल्या पूर्व भागातील शिंदेवाडी (श्रीरामपूर) येथे वादळी वाऱ्यामुळे सिमला मिरचीचे नेटशेड कोसळले. या घटनेमुळे किसन विठोबा खाडे या शेतकऱ्याचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
शिंदेवाडी-मिठसागरे रस्त्यालगत खाडे यांची शेती असून, त्यात सिमला मिरचीची लागवड केली आहे. त्यासाठी खाडे यांना सिन्नर येथील स्टेट बॅँकेकडून मंजूर झालेल्या दहा लाख रुपये कर्जापैकी आठ लाख रुपये मिळाले आहेत. या रक्कमेतून खाडे यांनी १५ दिवसांपासून नेटशेड उभारणीचे काम सुरू केले आहे. रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यामुळे सदर नेटशेड कोसळल्याने शेडचे कापड फाटले असून लोखंडी खांबही वाकले
आहेत. या नुकसानीमुळे नेटशेड उभारणीसाठी खाडे यांनी मजुरीपोटी दिलेले ३५ हजार रुपयेही वाया गेले आहेत. महसूल विभागाकडून
अद्याप या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला नसल्याचे खाडे यांनी सांगितले.
अचानक आलेल्या या अस्मानी संकटामुळे खाडे कुटुंबीय हबकून गेले असून, या नुकसानीमुळे बॅँकेकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे हा प्रश्न त्यांना सतावू लागला आहे. महसूल विभाग व स्टेट बॅँकेने सदर नुकसानीचा पंचनामा करून खाडे कुटुंबीयांना दिलासा देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)