कोरोनाने हिरावलेल्या माता-पित्याच्या चिमुरड्यांची गोष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:11 AM2021-06-01T04:11:00+5:302021-06-01T04:11:00+5:30
संजीव धामणे, नांदगाव : कोरोनाच्या पहिल्या लाटेतून ‘ती’ बरी झाली आणि वीजपंप सुरू करताना पाय घसरून विहिरीत पडून ...
संजीव धामणे, नांदगाव : कोरोनाच्या पहिल्या लाटेतून ‘ती’ बरी झाली आणि वीजपंप सुरू करताना पाय घसरून विहिरीत पडून दूरच्या प्रवासाला कायमची निघून गेली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पती गेला. तरुण जोडप्याची ही दुर्दैवी अखेर चिमुकल्यांना मात्र वाऱ्यावर सोडून गेली. वर्षापूर्वी गेलेल्या पत्नीच्या मागे, मुलांना आईच्या मायेची ऊब देण्याचा प्रयत्न करत असतानाच, कोरोनाने पित्यापासून दोघा मुलांची ताटातूट केली. मुलगा व सून गेल्याच्या दु:खात नातवांना कुशीत घेताना आजीने फोडलेला हंबरडा उपस्थितांचे काळीज पिळवटून गेला.
नांदगाव शहरापासून १० किमी अंतरावर असलेल्या एका खेड्यात घडलेली ही घटना म्हणजे कोरोनाने उद्ध्वस्त केलेल्या अनेक कुटुंबांपैकीच एक कहाणी आहे. गावागावात कहाणी तीच असली, तरी उघड्यावर पडलेल्या संसाराच्या व्यथा निरनिराळ्या आहेत. वयाची सत्तरी गाठलेली आजी. अर्धांगवायूच्या आजाराचा सामना करताना, तिची आधीच दमछाक झाली आहे. तिला स्वत:लाच कोणाच्या तरी आधाराची गरज लागते. घरात एक काका आहे, पण तोही गतिमंद आहे. पती-पत्नीच्या पश्चात दोन मुले असून, ती पाचवी व तिसरी या वर्गात शिकत आहेत. ऑनलाइन अभ्यास करताना वडिलांकडे मोबाइलचा हट्ट करणारा मुलगा आता पोरका झाला आहे. मयत व्यक्तीने शेतीच्या धंद्याला जोड व्यवसाय म्हणून गाय विकत घेतली होती. तिच्या दुधाचा रतीब घालून मुलांना चार बुकं शिकविण्याची स्वप्न बघत असताना कोरोनाची लागण झाली. नगरसूलच्या दवाखान्यात कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला. उपचार सुरू झाले, तोपर्यंत एचआरसिटीचा स्कोअर २२ पर्यंत गेला होता. खिलाडू वृत्तीमुळे गावातल्या युवापिढीत प्रिय असणारा ‘तो’ पुन्हा परतलाच नाही. शासकीय नियमाप्रमाणे पुढील सोपस्कारामुळे नंतर चिमुकल्यांना आपल्या पित्याचा चेहराही पाहता आला नाही. पीडित आजीला नातवांचा सांभाळ करण्याची वेळ आल्याने व शाळेत जाण्याच्या वयात घरही चालविण्याची जबाबदारी अंगावर पडलेल्या मुलांच्या कुटुंबाची कहाणी दगडाला पाझर फोडणारी आहे.
इन्फो
मुलांना हवा मदतीचा हात
कोरोनामुळे आई-बापाचे छत्र हरपलेल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची घोषणा नुकतीच केंद्र सरकारने केली आहे. त्या पाठोपाठ राज्य सरकारनेही अशा अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारण्याची तयारी केली आहे. सदर कुटुंबातील पोरक्या झालेल्या चिमुरड्यांनाही कुणीतरी आधार देत मायेचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.