म्हाळोबा महाराज यात्रेची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:25 PM2018-01-31T23:25:36+5:302018-01-31T23:59:13+5:30
सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक परिसरातील जागृत देवस्थान व धनगर समाजाचे आराध्यदैवत असलेल्या म्हाळोबा महाराज यात्रा उत्साहात संपन्न झाली. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या म्हाळोबा महाराज यात्रेत राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी दर्शन घेतले. विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक परिसरातील जागृत देवस्थान व धनगर समाजाचे आराध्यदैवत असलेल्या म्हाळोबा महाराज यात्रा उत्साहात संपन्न झाली. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या म्हाळोबा महाराज यात्रेत राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी दर्शन घेतले. विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दरवर्षी माघ पौर्णिमेला म्हाळोबा महाराज यात्रोत्सव असतो. नवसाला पावणारा म्हाळोबा महाराज यात्रेत भाविक नवसपूर्ती म्हणून बोकडबळी देण्याची परंपरा आहे. सोमवारपासून (दि.२९) यात्रेस सुरुवात झाली. पहिल्या दिवशी म्हाळोबा महाराज यांची विधिवत महापूजा झाली. रात्रभर भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मंदिरात डफाच्या तालावर धनगर समाजाचे भाविक गाणी गायली जात होती. बुधवारी (दि. ३१) स्थानिक भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. चंद्रग्रहण असल्याने भाविकांनी बोकडबळी दिले नाही. दुपारी ४ वाजेच्या सुमारास कुस्त्यांची भव्य दंगल झाली. यात नामवंत पहिलवान सहभागी झाले होते. विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात आली. दरम्यान, खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे यांनी म्हाळोबा महाराज यात्रेस भेट देऊन दर्शन घेतले. तीन दिवस चालेल्या यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल झाली. पोलीस प्रशासन व यात्रा समितीच्या सदस्यांनी यात्रा उत्साहात संपन्न होण्यासाठी चांगल्या प्रकारे नियोजन केले होते.
मुखवट्याची स्थापना
काठ्यांची डफाच्या तालावर गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. दुपारी मंदिरात मुखवट्याची स्थापना करण्यात आली. सायंकाळी स्थानिक भाविकांकडून मानाचे बोकडबळी देण्यात आले. दुसºया दिवशी म्हणजे मंगळवारी राज्याच्या कानाकोपºयातून धनगर समाजाचे भाविक दाखल झाले होते. दिवसभर मंदिरात विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्र म संपन्न झाले. नवसपूर्ती म्हणून बोकडबळी दिले जात होते. सायंकाळी पाऊल टेकडी येथे बाहेरून आलेल्या काठ्यांची भेट घडविण्यात आली.