सिंधी बांधवांच्या चालिहाव्रताची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 01:28 AM2018-09-12T01:28:07+5:302018-09-12T01:28:12+5:30
सिंधी समाजातील महत्त्वाचे मानले जाणारे व गेले चाळीस दिवस आचरण केलेल्या पूज्य चालिहा साहिब जो मेलो या व्रताची मंगळवारी सांगता करण्यात आली.
देवळाली कॅम्प : सिंधी समाजातील महत्त्वाचे मानले जाणारे व गेले चाळीस दिवस आचरण केलेल्या पूज्य चालिहा साहिब जो मेलो या व्रताची मंगळवारी सांगता करण्यात आली. ‘भगवान झुलेलाल’ यांच्या नावाचा जयघोष करीत संसरीच्या दारणा नदीपात्रात पवित्र बहराणा ज्योत व मटकीचे विसर्जन धार्मिक वातावरणात करण्यात आले.
दरम्यान, ४० दिवस व्रत करणाऱ्या सिंधी बांधवांनी हातात बांधलेले रक्षासूत्र व गळ्यात घातलेले जान्हवे पुजारी घनश्याम महाराज शर्मा यांनी विधियुक्त मार्गाने काढीत व्रतस्थ असलेल्या भाविकांना व्रताच्या आचरणातून मुक्त करीत असल्याचा आशीर्वाद दिला. पूज्य दयार्शाह संगत ट्रस्टच्या वतीने सकाळी १० ते ४ वाजेदरम्यान व्रताचे उर्वरित विधी-भजन पार पडले. यावेळी देवळालीच्या झुलेलाल मंदिरापासून हौसन रोड, लाम रोडमार्गे संसरी लेनमधून दारणा नदी तटापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीत सिंधी समाजाच्या महिलांनी टिपरीवर फेर धरला. भगवान झुलेलाल यांची आरती, अक्खा पावन मंत्र, पल्लव असे विधी केल्यानंतर व्रताची सांगता झाल्याचे जाहीर करण्यात आल्यावर उपस्थितांनी ‘आयोलाल-झुलेलाल’ व ‘जेको चंवदो झुलेलाल तहिंजा थिंदा बेडा पार’ चा जयघोष केला. सायंकाळी मंदिर परिसरात अध्यक्ष वासुदेव श्रॉफ यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मिरवणुकीत आनंद कुकरेजा, वासुदेव बत्रा, अमित रोहेरा, नगरसेवक भगवान कटारिया, सिंधी पंचायतीचे अध्यक्ष रतन चावला, मोहन सचदेव, जयप्रकाश चावला आदी उपस्थित होते.