कथा बैठकांची, कोटींच्या थैलीची..!
By admin | Published: June 20, 2017 01:25 AM2017-06-20T01:25:46+5:302017-06-20T01:26:00+5:30
व्यावसायिकांच्या निधी संकलनाने चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोणाचा हीरक, अमृतमहोत्सव असला किंवा विशेष काही प्रसंग तर अशावेळी शुभेच्छांबरोबर थैली देण्याची प्रथा आहे. कोणी अशा थैलीला गौरव निधीही म्हणतात. अलीकडील काळात अशी थैली जमा करण्याचा प्रसंग काही घडला नाही, परंतु सध्या मात्र काही व्यावसायिक थैली देण्यासाठी वारंवार बैठका घेत असून, त्यामुळे काही कोटी रुपयांची थैली जमा करण्याची चर्चा मात्र सर्वत्र रंगली आहे.
परंपरेने कधी कोणाला काय द्यावे हे ठरवून दिले असले तरी आता थैली संस्कृतीची ‘परंपरा’च पडली आहे. कोणाकडून काही काम करायचे म्हटले की, थैली देणे अटळच मानले जाते आणि त्यात देणाऱ्या आणि घेणाऱ्याला वावगे काहीच वाटत नाही. सध्या ज्या थैलीची चर्चा सुरू आहे, तिचे मोल मात्र काही अधिक प्रमाणात आहे. कारण ही थैली साधीसुधी नसून कोटी रुपयांची असल्याचे बोलले जात आहे. सध्या (अ)न्यायग्रस्त आणि त्यातून उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या एका विशिष्ट व्यावसायिक गटाकडून वारंवार बैठका घेतल्या जात असून, त्या थैलीसाठी निधी संकलन हेच एकमेव कारण दिले जात आहे. बरेतर निधी संकलनासाठी बैठका घ्याव्यात इतके आर्थिक दुर्बल हे व्यावसायिक नाहीत. म्हटले तर कोटींच्या थैलीचा भार त्यांच्यापैकी एकजणही पेलू शकतो.
एरव्ही कायद्याचे पालनकर्त्या प्रत्येकाच्या अवेतनीय आमदानीत हे सारेच व्यक्तिगत पातळीवर घालत असतात. भरीस भर अनेक गल्लीदादा, भाऊ आणि सामाजिक कार्यकर्ते याच व्यावसायिकांच्या जिवावर रोजगारही मिळवत असतात. परंतु आता कोणाची दृष्ट लागली कोणास ठावूक, त्यांचा व्यवसायच धोक्यात आला. बरे जिथे जाऊ तेथे विरोध..मग, काय करायचे? आई जेऊ देईना, बाप भीक मागू देईना प्रमाणेच मायबाप सरकार मरू देईना आणि जगायचे तर कसे... बहुधा याच उद्देशाने सध्या ग्रासलेल्या मंडळींच्या ठिकठिकाणी बैठका होतात. थैलीतील निधी संकलनाला ‘बार’ (म्हणजे ‘मर्यादा’ बरं का) नाही मात्र बैठकींसाठी बहुतांशी ‘बार’चाच आधार. विषय एकच थैलीसाठी निधी संकलन... बैठका घेऊन होणारे थैली संकलन कोणासाठी याचे उत्तर मात्र त्यांच्या पुरतेच मर्यादित असले तरी बाहेर मात्र त्याविषयी चर्चा रंगली आहे.