‘सरळ’ लढतीच्या शक्यता दुरावणे कुणाच्या पथ्यावर?

By किरण अग्रवाल | Published: March 17, 2019 01:48 AM2019-03-17T01:48:46+5:302019-03-17T01:51:53+5:30

नाशिक जिल्ह्यातील दोन्ही जागांवर ‘सरळ’ सामने होतील, असे प्रारंभीचे चित्र असताना वंचित बहुजन आघाडी व माकपानेही आपापले उमेदवार घोषित केले आहेत. यातून मतविभागणीलाच संधी मिळणार असून, सरळ लढतीला बहुरंगीपणामुळे वळण वा वळश्याचे मार्ग लाभून जाणे स्वाभाविक ठरले आहे. ही बाब कुणाच्या पथ्यावर पडेल याचा मात्र अंदाज बांधता येऊ नये.

'Straight' to the path of the competition? | ‘सरळ’ लढतीच्या शक्यता दुरावणे कुणाच्या पथ्यावर?

‘सरळ’ लढतीच्या शक्यता दुरावणे कुणाच्या पथ्यावर?

googlenewsNext
ठळक मुद्देमहाआघाडीत सहभागी न होता सवतेसुभे मांडू पाहणाऱ्यांकडून विरोधाच्या उद्देशालाच हरताळबहुरंगी लढतीचे संकेत

सारांश


परिस्थिती अनुकूल असो की प्रतिकूल; पण आताची संधी हातची गेली तर जणू पुन्हा ती मिळणारच नाही अशी भावना राजकारणात जेव्हा बळावते तेव्हा त्यातून उमेदवारी इच्छुकांची पक्षांतरे किंवा बंडखोरी तर घडून येतेच, शिवाय अस्तित्व अथवा अस्मितेच्या झगड्यात रेंगाळणाऱ्या पक्षांकडूनही स्वतंत्र वाटचालीचे निर्णय घेतले जातात. हेच निर्णय अंतिमत: संबंधितांच्या मूळ उद्देशासी विसंगत परिणाम घडविणारे ठरतात हा भाग वेगळा; परंतु प्राथमिक स्पष्टतेत धूसरता आणण्याचे काम यातून घडून आल्याखेरीज राहात नाही. सध्याच्या लोकसभा निवडणुकीचे चित्रही असेच काहीसे साकारताना दिसत आहे.

तसे पाहता कोणतीही निवडणूक ही ईर्षेने व त्वेषानेच लढली जात असते; पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हे मुद्दे जरा अधिकचे टोकदार झालेले दिसताहेत, कारण पक्षीय भूमिकांपेक्षाही शीर्षस्थ व्यक्तींच्या वर्तनाचे, मनोभूमिकेचे मुद्दे प्रकर्षाने चर्चेच्या अगर आक्षेपाच्या केंद्रस्थानी आले आहेत. भाजपा सरकारला शह देण्याची भाषा न होता मोदी-शहा जोडीला दूर ठेवण्याची भूमिका प्रतिपादिली जात आहे ती त्यातूनच, कारण त्यांच्या राजकीय अरेरावी किंवा एकाधिकारशाहीमुळे सर्वसमावेशकतेच्या धोरणालाच नख लागत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. म्हणूनच ‘मोदी हटाव’चा नारा घेऊन सर्व समविचारी विरोधकांची महाआघाडी साकारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु एकीकडे तसा उद्देश बोलून दाखवताना त्याला हरताळ फासून उलटपक्षी सत्ताधाऱ्यांना साहाय्यभूत ठरू शकणारी भूमिका घेताना संबंधित दिसून यावेत, हे निव्वळ आश्चर्याचे नव्हे तर राजकीय कट-कारस्थानाचेही संकेत ठरावेत.

राज्यातलेच उदाहरण घ्या, वंचित बहुजन आघाडीची काँग्रेसच्या महाआघाडीत सामील होण्याची बोलणी सुरू होती. पण त्यांनी त्याआधीच २२ उमेदवार घोषित करून दिले होते. आता तर एकाच झटक्यात ३७ उमेदवार घोषित केले गेले आहेत. काँग्रेसशी कोणत्याही पक्षाची आघाडी होऊ नये म्हणून भाजपाकडून दबावतंत्राचा वापर होत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे बोलताना केलाच, शिवाय समझोत्याचे राजकारण केले तर तुरुंगाची हवा नक्की असे घृणास्पद राजकारण सुरू असल्याचेही सांगितले; पण एकीकडे भाजपावर असा ‘ब्लॅकमेलिंग’चा आरोप करताना स्वत:ही त्याला बळी पडल्यागत त्यांनी स्वतंत्र वाटचालीचा निर्णय घेत उमेदवाºया घोषित केल्या, त्यामुळे विरोधकांत मतविभागणी होणे स्वाभाविक ठरून गेले आहे. डाव्या पक्षांनीही काँग्रेस आघाडीसोबत जाण्याचे ठरविले होते; परंतु त्यांच्या जिल्हा समित्यांनीही उमेदवारांची घोषणा करून ठेवली, परिणामी बहुरंगी लढती होण्याची शक्यता वाढून गेली आहे. असे झाले तर मतविभाजनाला संधी मिळून जिंकण्यापेक्षा पाडकामाच्या दृष्टीने काहींची उपयोगिता चर्चिली जाईल, तसे होणे संबंधितांसाठीही योग्य ठरू नये.

नाशिक जिल्ह्यात प्राथमिक अवस्थेत नाशिक व दिंडोरी या दोन्ही ठिकाणी सरळ लढतींचे अंदाज होते. त्यात राष्ट्रवादीने उमेदवार घोषित केल्याने इतरांचा मार्ग मोकळा झाला. विशेषत: दिंडोरीत अपेक्षेप्रमाणे धनराज महाले यांना उमेदवारी दिली गेल्याने डॉ. भारती पवार भाजपाच्या वाटेवर आहेत. नाशकात शिवसेनेच्या उमेदवारीसाठी विद्यमान खासदारांखेरीज अन्य दावेदार पुढे आलेले आहेतच. वंचित बहुजन आघाडीने दोन्ही ठिकाणी तर माकपाने दिंडोरीत उमेदवारी घोषित केली आहेच. नाशकात अन्य काही मातब्बरांची अपक्ष उमेदवारीही गृहीत धरली जात आहे. अशा स्थितीत प्रारंभी ‘सरळ’ वाटून गेलेल्या दोन्ही ठिकाणच्या लढती बहुरंगी होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मतदानातील बेरीज व वजाबाक्यांची गणिते काहीशी क्लिष्ट होऊ घातली आहेत. राजकीय पातळीवर अशी गणिते मांडणारी व्यक्ती बहुदा स्वत:च्या अनुषंगानेच आकडेमोड करीत प्राप्त परिस्थिती आपल्याच पथ्यावर पडणारी असल्याचे सांगत असते हेही खरे; पण तरी त्यातील धूसरता दुर्लक्षिता येणारी नसते. यात दोघांत तिसरा असला तरी एकवेळ गणित सोडवता येते, पण बहुरंगीपणात ते कठीण असते. नाशिक जिल्ह्यातील दोन्ही जागांवर तेच होण्याची लक्षणे आहेत. अर्थात, निवडणुकीचा बाजार आताशा कुठे बसू लागल्याने अजूनही वेळ गेलेली नाही. आपल्याकडे तर चौथ्या टप्प्यात मतदान असल्याने दरम्यानच्या काळात बरेच काही घडून येऊ शकण्याची आशा सोडता येऊ नये.

Web Title: 'Straight' to the path of the competition?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.