Nashik ST Accident Video: विचित्र दुर्घटना... नशिबाने अन् स्थानिकांमुळेच वाचले ४३ प्रवासी, बस जळून खाक

By अझहर शेख | Published: December 8, 2022 02:23 PM2022-12-08T14:23:27+5:302022-12-08T14:24:08+5:30

बसमधील ४३ प्रवाशांच्या जीवाला या दुर्घटनेत धोका निर्माण झाला असता. आज दुपारी १२.३० वाजता ही दुर्घटना घडली. 

Strange accident in nashik... 43 passengers survived due to luck and locals, bus burnt down | Nashik ST Accident Video: विचित्र दुर्घटना... नशिबाने अन् स्थानिकांमुळेच वाचले ४३ प्रवासी, बस जळून खाक

Nashik ST Accident Video: विचित्र दुर्घटना... नशिबाने अन् स्थानिकांमुळेच वाचले ४३ प्रवासी, बस जळून खाक

googlenewsNext

नाशिक - ऑक्टोबर महिन्यातच नाशिकजवळील तपोवन येथे बसला आग लागून झालेल्या भीषण दुर्घटनेत १३ जणांना मृत्यू झाला होता. त्यानंतर, आजही तसाच विचित्र अपघात नाशिकपासून ६ ते ७ किमी अंतरावर घडला आहे. सुदैवाने, स्थानिकांच्या मदतीने बसमधील सर्वच प्रवासी बाहेर काढण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, या दुर्घटनेत २ दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर आहे. तर, बसमधील ८ प्रवासी किरकोळ जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच महापालिका, जिल्हा आणि पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. मात्र, या अपघाताचा घटनाक्रम ऐकून अनेकांच्या मुखातून नशिबच... असा शब्द आपसूकच बाहेर पडतोय. कारण, थोडाजरी विलंब झाला असता तर बसमधील ४३ प्रवाशांच्या जीवाला या दुर्घटनेत धोका निर्माण झाला असता. आज दुपारी १२.३० वाजता ही दुर्घटना घडली. 

राज्य परिवहन महामंडळाची एम एच १४ बीटी ३६३५ ही विठाई बस पळशे चौफुलीच्या बस थांब्यावर थांबली. तेथे त्यातून काही प्रवासी उतरत होते, त्याचवेळी पाठीमागून दुसरी बस, जी पुणे राजगुरुनगर-नाशिक (एमएच. ०७ सी ७०८१ ) असा प्रवास करत आली होती. या बसने बस थांब्यावर उभ्या असलेल्या विठाई बसला जोरदार धडक दिली. त्यावेळी, या दोन्ही बसच्या मधोमध उभे असलेल्या ३ दुचाकीस्वार हे बसमध्ये दाबले गेले. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, बसमध्ये अडकलेल्या दुचाकीला स्पार्किंग होऊन बसने पेट घेतला. तत्पूर्वी दोन बस एकमेकांवर आदळल्याने मोठा आवाज झाला होता. या आवाजामुळे स्थानिक नागरिक आणि दुकानदारांनी बसकडे धाव घेतली. यावेळी, पुण्याहून आलेल्या बसमध्ये ४३ प्रवासी होते, या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी उपस्थितांना त्या बसच्या दरवाजा, खिडक्याच्या काच्या आणि मागील दरवाजा फोडण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्यामुळे, बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले. बसमधील प्रवाशांना मुक्का मार लागला असून ८ जण जखमी झाले आहेत.  

बस चालकाशी संवाद

दरम्यान, राजगुरुनगर-नाशिक बसचे बसचालक राजेंद्र अंबादास उईके, महिला वाहक आशा शेळके दोघेही सुखरुप आहेत. पळसे चौफुलीच्या बस थांब्याजवळील गतीरोधक पाहून मी बसचा ब्रेक दाबला, पण बसचा ब्रेक न लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि समोरील बसवर ही बस धडकली, असे बसचालक राजेंद्र उईके यांनी लोकमतच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

ऑक्टोबर महिन्यातही बस जळाली

विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यात नाशिक शहराजवळच औरंगाबाद महामार्गावरील तपोवन येथे एका खासगी बसला  असाच भीषण अपघात झाला होता. त्यामध्ये १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता, या घटनेनं महाराष्ट्र हादरला होता. सुदैवाने आज या घटनेची पुनरावृत्ती होता होता टळली. मात्र,, या घटनेवरुन भीषणता आणि  तीव्रता दिसून येती. 

बस अपघातात जखमी झालेल्या राजगुरू नगर-नाशिक बस मधील प्रवाशांची नावे खालीलप्रमाणे

हर्षदा मंगेस पोंदे, संगमनेर
रुपाली सचिन दिवटे, अकोले
समृद्धी सचिन दिवटे
सईदा इनामदार, संगमनेर
मुस्तफा शेख, संगमनेर
नसमा जहाँगिरदार, संगमनेर
औवेस अहमद, धारावी मुंबई
सिताराम देवराम कुरणे, सिकर

या सर्व प्रवाशांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

Web Title: Strange accident in nashik... 43 passengers survived due to luck and locals, bus burnt down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.