विल्होळी येथे महाराष्ट्र बँकेचा अजब कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 06:00 PM2020-12-19T18:00:05+5:302020-12-19T18:03:51+5:30
विल्होळी : येथील बँक ऑफ महाराष्ट्रचा कारभार अजब पद्धतीने चालू असून याकडे बँकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दिसून येत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत.
विल्होळी : येथील बँक ऑफ महाराष्ट्रचा कारभार अजब पद्धतीने चालू असून याकडे बँकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दिसून येत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत.
विल्होळी, सारूळ, राजुर बहुला, आंबे बहुला, पिंपळद, जातेगाव, रायगड नगर या ग्रामीण भागासाठी ही एकमेव बँक असल्याने येथे खातेदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यात बँकेत एकच काऊंटर असल्याने मोठ्या रांगा लागतात. असे असतानाही या बँकेत अजब व मनमानी कारभार चालू आहे.
नागरीक गरज असल्याने बँक सुरु होण्या अगोदरच बँकेबाहेर रांगा लावून उभे असतात. शनिवारी (दि.१९) ग्राहकांची सकाळी नऊ वाजेपासून रांग लागलेली असताना दहा वाजेला बँक उघडली, परंतु बँकेचे व्यवस्थापक व कॅशियर दुपारी एक वाजता आल्याने ग्राहकांना तीन-चार तास ताटकळत उभे रहावे लागले.
याबाबत ग्राहकांनी बँक कर्मचाऱ्यास विचारले असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. गेल्या अनेक दिवसापासून बँकेचा अजब कारभार चालू असून कधी व्यवस्थापक येत असेल तर कॅशियर येत नाही, तर कधी कॅशियर येत असेल तर व्यवस्थापक येत नाही, त्यामुळे पैशाची देवाणघेवाण करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
नवीन खाते उघडणार्यांना आठ ते दहा दिवस काम धंदा सोडून चकरा माराव्या लागत आहेत.
बँक ग्रामीण भागात असल्याने या भागातील ग्राहकांना बँकेचे फॉर्म भरता येत नाही, त्याबाबत बँकेकडून सहकार्य केले जात नाही. परिणामी ग्राहकांना फॉर्म भरण्यासाठी गावभर फिरावे लागते.
शिवाय गेल्या अनेक दिवसापासून बँक परिसरात अस्वच्छता असल्याचे दृष्य पहावयास मिळते. बँकेच्या स्वच्छतेसाठी कर्मचारी नसल्याचे सांगितले जाते. सदर बँकेची पार्किंग नसल्याने येणारी वाहने रस्त्यावर उभी राहत असून अनेक छोटे मोठेअपघात नेहमीच येथे घडत आहे. याबाबत बँकेकडे व ग्रामपंचायतीकडे सतत तक्रारी करूनही अद्यापपर्यंत पार्किंगची व्यवस्था केली गेलेली नाही.
बँकेच्या एटीएमची दुर्दशा...
विल्होळी पंचक्रोशित एकच केटीएम असल्याने पैसे काढण्यासाठी येथे गर्दी होते. परंतु अनेक वेळा ह्या एटीएम मध्ये खडखडाट असते त्यामुळे अनेक ग्राहकांची गैरसोय होते.
सकाळी नऊ वाजेपासून बँकेच्या समोर रांगेत उभा होतो. दहा वाजता बँक उघडली. पण बँकेचे कॅशियर व व्यवस्थापक न आल्याने माझे सर्व काम सोडून मला चार तास बँकेच्यासमोर रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. बँकेची वेळ निघून गेल्यानंतर कॅशियर दुपारी एक वाजता आले. मोठी रांग असल्याने त्यामध्ये माझ्यासह अनेक नागरिकांचा त्रास सहन करावा लागला.
- दिनेश रूपवते, बँक ग्राहक.