अजब प्रकार; मंदिरासमोरच मांडला बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:39 AM2017-10-24T00:39:19+5:302017-10-24T00:39:29+5:30
शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने हॉकर्स झोनचे नियाजन करण्यात आले असले तरी त्याचे नियोजनच चुकीचे असल्याच्या तक्रारी आहे. विशेषत: दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या श्री काळाराम मंदिराचा परिसर अतिक्रमणमुक्त ठेवण्याची गरज असताना नेमके मंदिरासमोरच बाजार घटल्याने भाविकांना मंदिरात प्रवेश करणेही कठीण होऊन गेले आहे.
नाशिक : शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने हॉकर्स झोनचे नियाजन करण्यात आले असले तरी त्याचे नियोजनच चुकीचे असल्याच्या तक्रारी आहे. विशेषत: दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या श्री काळाराम मंदिराचा परिसर अतिक्रमणमुक्त ठेवण्याची गरज असताना नेमके मंदिरासमोरच बाजार घटल्याने भाविकांना मंदिरात प्रवेश करणेही कठीण होऊन गेले आहे. विशेषत: अतिरेक्यांच्या रडारवर असलेल्या या मंदिराच्या परिसरातील टपºयांमुळे मंदिराच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहराच्या विविध भागांतील अतिक्रमणे आणि अन्य अडचणी सोडविण्यासाठी महापालिकेने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धोरण तयार केले. त्यानंतर संपूर्ण शहराचा विचार करून महापालिकेने सुमारे पावणे दोनशे हॉकर्स झोन तयार केले आहेत. मात्र अनेक हॉकर्स झोन साकारताना परिसराचा विचार न करता ते ठरविण्यात आले आहेत. पंचवटीतील काळाराम मंदिरासमोरील हॉकर्स झोन म्हणजे अशाच प्रकारे पालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा नमुना ठरला आहे. दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या श्री काळाराम मंदिराच्या परिसरात यापूर्वी काही मोजकीच पूजा साहित्य विक्री आणि अल्पोहाराची दुकाने थाटली आहेत. मंदिरासमोरील उद्यान आणि त्यासमोरील बाकी सर्व परिसर मोकळा होता. त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी येणाºया पर्यटकांना त्यांच्या मोटारी उभ्या करता येत होत्या. मंदिराजवळच सीतागुंफा असल्याने पर्यटकांच्या बसगाड्या तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीच्या बसदेखील येथेच येत असत. परंतु आता महापालिकेने काळाराम मंदिरासमोरील मोकळा परिसर पूर्णत: हॉकर्स झोनसाठी खुला केला असून, तेथे सर्वच प्रकारच्या व्यावसायिकांना जागा दिल्याने अतिक्रमणमुक्त परिसर आता आतिक्रमणयुक्त दिसत आहे. भाविकांना आणि नागरिकांना येथे येणे कठीण झाले आहे. हॉकर्स झोन अंतर्गत येथे पंधरा टपºया ठेवण्याचे नियोजन असले तरी टपºयांचा आकार किती किंवा अन्य अधिकार थेट विभागीय अधिकाºयांना असून, अशावेळी टपºयांचे आकार आणि संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे काळाराम मंदिर ही पुरातन वास्तू असून, ती पुरातत्व खात्याने संरक्षित केली आहे, परंतु त्याचबरोबर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्याने पोलीस यंत्रणेनेदेखील त्याला विशेष संरक्षण म्हणून नजर ठेवलेली आहे. अशावेळी मंदिराच्या परिसरातील टपरी व्यावसायिकांच्या आडून कोणीही अतिरेक्यांनी गैरफायदा घेतला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न आहे. यासंदर्भात श्री काळाराम मंदिर विश्वस्तांनीदेखील नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.