पाथरेतील वीजतारा धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:15 AM2018-03-26T00:15:08+5:302018-03-26T00:15:08+5:30
सिन्नर तालुक्यातील पाथरे ते शहा या रस्त्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. परंतु या रस्त्यावरून गेलेल्या वीजतारा शेतकऱ्यांना, वाहनचालकांना अडचणीच्या ठरत आहे.
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे ते शहा या रस्त्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. परंतु या रस्त्यावरून गेलेल्या वीजतारा शेतकऱ्यांना, वाहनचालकांना अडचणीच्या ठरत आहे. हानी जरी मोठी नसली तरी चिंता करणारी आहे. याठिकाणी जीवित वा वित्तहानी झाली नाही. असे या अगोदरही घडले होते असे परिसरातील शेतकºयांनी सांगितले. रस्त्यावरून जवळपास एकोणावीस ठिकाणी तारा आडव्या गेल्या आहेत. त्या सर्व तारांचे अंतर कमी झाले आहे. तीन ठिकाणी रस्त्यात पोल आहे. वाहन चालवताना या ठिकाणी अपघात होऊ शकतो. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने आम्हाला पूर्वसूचना केली नसल्याचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे. रस्त्याच्या कामाअगोदर वीज मंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबद्दल विचारणा केली असल्याचे समजते. कोटेशनही पाठवल्याचे समजते. परंतु ही आपली जबाबदारी नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. वीज मंडळाने याअगोदर तारा ओढण्याची परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. यामुळे हा मुद्दा ऐरणीवरचा जरी असला तरी यामुळे अडचणींना सामोरे मात्र परिसरातील शेतकºयांना, वाहनचालकांना जावे लागत आहे. जीवित वा मोठी वित्तहानी झाल्यानंतर यावर तोडगा निघणार असेल तर वाईट आहे. जेव्हा या रस्त्याचे काम पूर्ण होईल आणि रहदारीचे प्रमाण वाढेल तेव्हा या तारा तुटण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतील. पाथरे ते कोळगाव रस्त्याचे कामही याच योजनेतून होत आहे. तेथेही अशीच समस्या निर्माण होणार आहे. यामुळे परिसरातील शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. यावर त्वरित उपाय काढावा, असे पाथरे, शहा, कोळगाव येथील शेतकरी व ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
विजेच्या तारांचे अंतर कमी
पाथरे ते शहा हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून पूर्ण होत आहे. या रस्त्याचे खडीकरण, मातीचा भर, डांबरीकरण यामुळे उंची वाढत आहे. परीणामी या स्त्यावरून गेलेल्या विजेच्या तारांचे अंतर कमी झाले आहे. या स्त्यावरून वाहतुकीचे प्रमाण वाढते आहे. जड, मोठी वाहने या रस्त्यावरून जात असतात. त्यामुळे या तारा तुटण्याचा प्रकार होत आहे. यातून वीज पुरवठा होत असल्याने ठिणग्या पडत आहे. नुकतेच शहा जवळील बंधाºयाजवळ तारा तुटून ठिणग्या पडून एका शेतकºयाच सरपण जळाले.