स्ट्रॉबेरीमुळे आदिवासी शेतकऱ्यांना उभारी
By संजय डुंबले | Published: January 24, 2019 01:20 AM2019-01-24T01:20:27+5:302019-01-24T01:23:29+5:30
पारंपरिक पिकांना स्ट्रॉबेरीचा चांगला पर्याय मिळाल्याने जिल्ह्यातील आदिवासी शेतकरीही आता लाखांच्या गोष्टी करू लागले आहेत. जिल्ह्याच्या पेठ, सुरगाणा या आदिवासी तालुक्यांतील आदिवासी शेतकरी स्ट्रॉबेरी पिकाकडे वळाले असून, त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले आहे.
यशकथा
नाशिक : पारंपरिक पिकांना स्ट्रॉबेरीचा चांगला पर्याय मिळाल्याने जिल्ह्यातील आदिवासी शेतकरीही आता लाखांच्या गोष्टी करू लागले आहेत. जिल्ह्याच्या पेठ, सुरगाणा या आदिवासी तालुक्यांतील आदिवासी शेतकरी स्ट्रॉबेरी पिकाकडे वळाले असून, त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. सुरगाणा तालुक्यातील घाटमाथ्यावरील घोडांबे येथील महारू विठू गांगुर्डे यांनी स्ट्रॉबेरी लागवडीतून चांगली आर्थिक कमाई केली असून, त्यांनी आता लागवड क्षेत्र वाढविले आहे.
आदिवासी पट्ट्यात स्ट्रॉबेरी शेतीला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. सुरुवातीला अनुभव नसल्यामुळे कमी क्षेत्रावर घेतल्या जाणा-या या पिकाचे क्षेत्र आता वाढले आहे. तालुक्यातील एका शेतक-याने १० वर्षांपूर्वी स्ट्रॉबेरीची लागवड केली होती. ते क्षेत्र पाहण्यासाठी घोडांबे येथील महारू विठू गांगुर्डे गेले होते. तेथूनच त्यांना स्ट्रॉबेरी लागवडीची प्रेरणा मिळाली. सुरुवातीला त्यांनी पाच गुंठ्यांवर स्ट्रॉबेरीची लागवड केली. त्यावेळी त्यांना महाबळेश्वर येथून रोपे आणावी लागली होती. पाच गुंठे क्षेत्रात त्यांना १० क्विंटल स्ट्रॉबेरीचे उत्पादन मिळाले होते. गुजरात महामार्गावर त्यांनी हात विक्रीने त्याची विक्री केली. कमी लागवडीतूनही त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळाल्याने त्यांचा उत्साह वाढला आणि त्यानंतर ते गेल्या १० वर्षांपासून सातत्याने स्ट्रॉबेरीची लागवड करीत आहेत. एक एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड करण्यासाठी साधारणत: ३० ते ४० हजार रुपये खर्च येतो. त्यात मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन, रोप, खत, औषध यांचा समावेश असतो.
लागवडीनंतर साधारणत: सहा महिन्यांनंतर झाडांना फळधारणा होते. फळधारणा झाल्यानंतर पुढे दोन महिने पीक चालू राहते. चांगले पीक असेल, तर आठवड्यातून दोन तोडे होतात. आठवड्याला साधारणत: तीन क्विंटल (१५० ट्रे) उत्पादन मिळते. चांगला भाव मिळाला, तर सुमारे दोन लाखांपर्यंत आर्थिक उत्पन्न या पिकातून मिळू शकते, असे गणित महारू गांगुर्डे यांनी मांडले. त्यांनी आता तीन एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवड केली असून, यातून त्यांना अडीच ते तीन लाख रुपये नफा खर्च वजा जाता मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
गुजरात राज्यातील अहमदाबाद, सुरत, बडोदा या ठिकाणी ते माल विक्रीसाठी पाठवितात. या भागात माल पाठविण्यासाठी शेतकºयांना बॉक्स पॅकिंगचा खर्च करावा लागतो. एका बॉक्समध्ये साधारणत: दोन किलो स्ट्रॉबेरी बसते. या पॅकिंगचा सुमारे ४० ते ५० रुपये खर्च येतो.
वयोवृद्धांना नवा रोजगार
शेतकºयाला ७० ते ८० रुपये किलोचा दर मिळाला, तर स्ट्रॉबेरीची शेती फायद्याची ठरते. अनेक स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी स्वत:च हात विक्रीने मालाची विक्री करतात. यामुळे घरातील वयोवृद्धांना एक नवा रोजगारही उपलब्ध झाला आहे. पारंपरिक पिकांऐवजी आदिवासी भागात स्ट्रॉबेरी हे नगदी पीक मानले जात असून, छोट्याशा क्षेत्रात सुरुवात केली तरी हातात पैसे खेळू शकतात, असे महारू गांगुर्डे सांगतात.