भरकटलेल्या पिढीला सुसंस्कारित करण्याची ताकद
By Admin | Published: September 2, 2016 11:31 PM2016-09-02T23:31:47+5:302016-09-02T23:32:03+5:30
स्वामींच्या विचारातमहंतांचा विश्वास : महानुभाव पंथाचे तत्त्वज्ञान समाजासाठी तारक
मुकुंद बाविस्कर नाशिक
‘कुतस्त्वा कश्मलमिंद विषमे समुपस्थितम्’ या श्रीमद्भगवद् गीतेतील वचनाचा भावार्थ असा की, कोणत्याही क्षणीक सुखाचा मोह हा मनुष्याला विनाशाकडे नेणारा मार्ग असतो. त्यासाठी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा स्वीकार करण्यासाठी जेव्हा मनुष्याला स्वत:चाच धाक नसेल तेव्हा निदान कुटुंब, समाज, धर्म-पंथाचा धाक असावा लागतो. आजच्या मोहमयी जगतात, असा धाक तथा शिस्त तरुण पिढीमध्ये निर्माण करून त्यांना व्यसने व कुमार्गापासून प्रवृत्त करीत सुसंस्काराकडे वळविण्याची ताकद महानुभाव पंथ व चक्रधर स्वामी यांच्या विचार व तत्त्वज्ञानात आहे, असा दृढविश्वास पंथातील अभ्यासकांनी आणि संत महंतांनी व्यक्त केला.
दरम्यान, या पंथातील अनुयायी व साधकांनीही आपल्याला याची पदोपदी प्रचिती येत असल्याची भावना व्यक्त केली. चक्रधर जयंतीच्या पार्श्वभूमीवर आजच्या काळात महानुभाव पंथाचे आचार विचार व स्वामींची सत्वचने समाजहितासाठी अत्यंत पोषक आणि मौल्यवान असल्याचे अनेकांनी सांगितले. इतकेच नव्हे तर नैराश्यातून परावृत्त करीत सन्मानाने जीवन जगण्याचे तत्त्व पंथ सांगत असल्याने कोणीही खरा पंथीय आत्महत्त्येस प्रवृत्त होत नाही, असेही काही महंतांनी सांगितले.
बाराव्या शतकात वैदीक धर्माच्या नावाखाली कर्मकांड युक्त धर्माचा पगडा निर्माण झालेला होता. एक प्रकारे चक्रधर स्वामी यांच्या रूपाने महाराष्ट्रात समाज परिवर्तनाची आणि धर्मप्रवर्तनाची लाट आली. गुजरात राज्यातून महाराष्ट्रात परिभ्रमणासाठी आलेल्या स्वामींनी मराठी मुलुख हीच आपली कर्मभूमी मानून तळमळीने व कळकळीने समाजोद्धाराचे व लोकजागरणाचे कार्य केले.
‘सर्व जिवांना धर्माचा, मोक्षाचा व भक्तीचा अधिकार आहे. स्त्री-पुरुष समान असून वर्ण व्यवस्था मानू नका, सत्य-अहिंसेचे पालन करा, मद्य-मांसादी सप्त व्यसनांपासून दूर राहा, असा साध्या सोप्या भाषेत लोकप्रबोधनाचा प्रचार व प्रसार गावागावात जाऊन स्वामी व त्यांच्या शिष्य परिवाराने केला. इतकेच नव्हे तर हिंसेकडे वळालेल्या, भटकलेल्या तरुणांना शांतीचा मार्ग सांगितला. आजच्या काळातील दहशतवादी, व्यसनाधीन व नैराश्यवादी तरुण पिढी बघता पुन्हा एकदा सुंदर व आशावादी जीवनाकडे वळविण्यासाठी चक्रधर स्वामींच्या विचारांची मोठ्या प्रमाणावर मांडणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. नेमकी हीच मांडणी पंथीय महंत करीत आहेत, असे मत अखिल भारतीय महानुभाव युवा परिषदेचे अध्यक्ष, महंत संतोषमुनी शास्त्री कपाटे यांनी व्यक्त केले.