नदीपात्रात उडी घेणाऱ्या तरूणीला ‘निर्भया’चे गोदाकाठावर बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 10:14 PM2019-10-01T22:14:24+5:302019-10-01T22:16:52+5:30
....अखेर त्यांनी तिचा मोबाईल ताब्यात घेऊन त्याद्वारे तिच्या जवळच्या मैत्रिणींसोबत संपर्क साधला. साधारणत: तासाभरात तिच्या मैत्रिणी तेथे पोहचल्या.
नाशिक : प्रेमभंग झाल्यामुळे नैराश्यात बुडालेल्या एका २२ वर्षीय तरूणीने थेट सोमेश्वर मंदिराच्या परिसरातील गोदाकाठ गाठून आत्महत्त्येची तयारी के ल्याचे लक्षात आल्यानंतर एका जागरूक रिक्षाचालकाने तत्काळ ‘निर्भया पथका’ला माहिती दिली. काही वेळेतच निर्भया पथक-२ तत्काळ सोमेश्वर परिसरात दाखल झाले आणि या पथकामधील साध्या वेशातील महिला पोलिसांनी त्या युवतीला ताब्यात घेऊन समुपदेशन करत तिच्या मैत्रिणींना बोलावून सुखरूप त्यांच्याकडे सोपविले.
नंदूरबार जिल्ह्यातून शहरात उच्चशिक्षण घेण्यासाठी आलेल्या एका तरूणीने प्रियकरासोबत झालेल्या वादविवादातून नाराज होत थेट आपले जीवनच संपविण्याचा टोकाचा विचार केला. त्या तरूणीने मंगळवारी (दि.१) सोमेश्वर मंदिर परिसर गाठला. मंदिरात दर्शन घेऊन ती तरूणी बोटक्लबच्या दिशेने पाय-या उतरून गेली. तेथे काही वेळ बसल्यानंतर पुन्हा उठून दुधस्थळी धबधब्याच्या दिशेने मंदिरापासून नदीकाठाने जाऊ लागली. पुन्हा माघारी येऊन काही वेळ येथील पायऱ्यांजवळील झाडाखाली बसली. तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने एका ढमाळ नावाच्या रिक्षाचालकाचे लक्ष वेधले गेले. नेहमीप्रमाणे गस्तीवर येणाºया निर्भया पथक क्रमांक-२च्या उपनिरिक्षक नेहा सुर्यवंशी यांच्याशी ढमाळ यांनी थेट संपर्क साधत माहिती दिली. यावेळी सुर्यवंशी यांनी त्यांना त्या तरूणीवर पथक पोहचेपर्यंत लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला. जुना गंगापूरनाका येथून तत्काळ सुर्यवंशी यांचे निर्भया-२चे वाहन सोमेश्वरच्या दिशेने वेगात निघाले. दुपारी ४ वाजेच्या सुमारास पथक दाखल झाल्यानंतर सुर्यवंशी यांनी त्या युवतीसोबत चर्चा करत तिचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला; मात्र तिचे रडणे काही मिनिटांपर्यंत थांबत नव्हते. अखेर त्यांनी तिचा मोबाईल ताब्यात घेऊन त्याद्वारे तिच्या जवळच्या मैत्रिणींसोबत संपर्क साधला. साधारणत: तासाभरात तिच्या मैत्रिणी तेथे पोहचल्या. तोपर्यंत सुर्यवंशी यांच्यासह त्यांच्या संपूर्ण चमूने त्या तरुणीचे समुपदेशन करत जबाबदारीचे जाणीव आणि जीवनाचे मोल पटवून देण्याचा पुरेपुर प्रयत्न केला.
प्रेमवीराला ‘खाकी’ शैलीत समज
सुर्यवंशी याने प्रेमवीरासोबत त्या तरूणीच्या मोबाईलवरून संपर्क करत त्याला ‘खाकी’च्या शैलीत समज दिली. त्याने तरूणीला ओळखत असल्याची क बुली त्यांनी दिली. नाशिकला आल्यानंतर तत्काळ येऊन भेटण्याची समज निर्भया पथकाने प्रेमवीराला दिली आहे. तसेच आपल्या प्रेयसीसोबत संवाद करून तिला आलेले नैराश्य दूर करण्याचाही सल्ला यावेळी त्यांनी दिला.