दु:ख कमी करण्यासाठी मन मजबूत करावे : नरेंद्राचार्य महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 02:52 PM2020-02-04T14:52:31+5:302020-02-04T14:55:32+5:30
मनुष्याला गुलाबासारखे जगायचं असेल तर प्रपंच करायला हवा. प्रपंच रडतखडत करू नये. प्रपंचात असताना कोणतीही चिंता करू नये. जीवन हा प्रवास आहे, यात सुख दु:ख हे येणार आहे. जीवनातील दु:ख कमी करण्यासाठी मन मजबूत करावे लागेल.
नाशिक : मनुष्याला गुलाबासारखे जगायचं असेल तर प्रपंच करायला हवा. प्रपंच रडतखडत करू नये. प्रपंचात असताना कोणतीही चिंता करू नये. जीवन हा प्रवास आहे, यात सुख दु:ख हे येणार आहे. जीवनातील दु:ख कमी करण्यासाठी मन मजबूत करावे लागेल. यासाठी अंतर्मन बिहर्मन एकत्र करावे यामुळे मनाला स्थैर्य निर्माण होईल व आपले प्रश्न आपोआप सुटतील. असे, प्रतिपादन रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी समस्या मार्गदर्शन प्रवचन दर्शन सोहळयाप्रसंगी भक्तांना मार्गदर्शन करताना केले.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने आशेवाडी जवळील जनम संस्थानाच्या आश्रमात मंगळवारपासून दोन दिवसीय प्रवचन, दर्शन व समस्या मार्गदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी त्यांनी असे सांगितले की, जीवनात दु:ख येण्याचे याचे कारण म्हणजे आपल्या वागण्यात असलेला दुष्परिणाम आहे. काही चुका आपण स्वत: जाणून बुजून करतो चुका होऊ नये म्हणून सद्गुरूच्या सानिध्यात यावे. गुरूंच्या कृपेने दु:ख निवारणाची क्षमता निर्माण होते आपल्या जीवनात आनंद निर्माण होतो. सुख दु:खाला कसे सोडून द्यायचे किंवा कवटाळायचे हे स्वत:वर अवलंबून आहे. आपले मन मजबूत केल्यास दु:ख निर्माण होत नाही. संयम, चिकाटी, साधक बाधक विचार करता आला पाहिजे. प्रत्येकाचे शरीर व प्रत्येकात चैतन्य सारखेच असते. तुम्ही स्वत: देव आहे आणि तुमचे देवत्व तुमच्या कृतीतून दिसते. अनुभूती केवळ गुरूंच्या सहवासात येते. देवाजवळ पैशांची गरज नसते देव भक्तीचा भुकेला असतो. गुरु प्रती दृढ विश्वास ठेवणे गरजेचे आहे.रोज दहा मिनिटे भक्ती करावी. स्वप्नात कुणाचे वाईट चिंतू नये व कुणाला फसवू नये कुणाला त्रास होणार याची काळजी प्रत्येक भक्तांनी घ्यावी असे त्यांनी सांगितले.