नाशकातील धान्य, किराणा व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:30 AM2020-12-13T04:30:22+5:302020-12-13T04:30:22+5:30

नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य, किराणा व्यापाऱ्यांकडून होत असलेल्या एक टक्का सेवा शुल्क वसुलीला नाशिकमधील धान्य, किराणा ...

Strict closure of grain and grocery traders in Nashik | नाशकातील धान्य, किराणा व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

नाशकातील धान्य, किराणा व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

Next

नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य, किराणा व्यापाऱ्यांकडून होत असलेल्या एक टक्का सेवा शुल्क वसुलीला नाशिकमधील धान्य, किराणा व्यापाऱ्यांनी शनिवारी (दि.१२) कडकडीत बंद पाळून विरोध केला. केंद्र व राज्य सरकारकडून वस्तु व सेवा कर आणि आयकर आकारला जात असतानाही बाजार समितीकडून आकारला जाणार सेवा शुल्क कर अन्यायकारक असल्याची भूमिका घेत घाऊक धान्य, किराणा व किरकोळ किराणा व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी होत बाजार समिती संचालक मंडळाविरोधात जोरदार निदर्शनेही केली.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात व्यापाऱ्यांकडून एक टक्का शुल्क आकारण्यास घाऊक धान्य किराणा व किरकोळ किराणा व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. व्यापारी दरवर्षी प्रत्येक गाळ्यामागे महापालिकेला सुमारे १५ हजार रुपयांची घरपट्टी व मार्केट कमिटीला वार्षिक देखभाल दुरुस्ती खर्चापोटी २५ हजार रुपये तसेच शेतसारा व नियंत्रित मालावर मार्केट फी देत असताना या व्यतिरिक्त सेवा शुल्काच्या नावाखाली आणखी १ टक्का वसुली का, यामागचा नेमका हेतू काय, या सेवा शुल्कातून व्यापाऱ्यांना काय सुविधा मिळणार, असे प्रश्न उपस्थित करीत धान्य किराणा व्यापाऱ्यांनी मार्केट कमिटी विरोधात निदर्शने केली. यावेळी घाऊक धान्य, किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांच्यासह मनोज वडेरा, अशोक वैश्य, राकेश भंडारी, राजेश मालपुरे, पंकज लोढा, प्रसाद जाजू, श्याम दशपुत्रे, महेंद्र पटेल, सुरेश मंत्री, विजय काकड, राजन दलवाणी, नेमिचंद कोचर, रामनाथ मुंदडा, नीलेश पटेल आदी उपस्थित होते.

इन्फो-

पणनमंत्र्यांकडे अपील

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात एक टक्का सेवा शुल्क आकारण्याविरोधात व्यापारी संघटनांनी पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे अपिल दाखल केले आहे. यावर योग्य निर्णय होत नाही अखवा सकारात्मक तोडगा निघत नाही, तोपर्यंत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने कोणत्याही प्रकारचे सेवा शुल्क वसूल न करता व्यापाऱ्यांच्या वाहनांना मुक्त प्रवेश देण्याची मागणी नाशिक धान्य किराणा व किरकोळ किराणा व्यापारी संघटनांनी केली आहे.

(आरफोटो- १२किराणा मर्चंट)

रविवारपेठेतील किराणा गल्लीत बाजार समिती सेवाशुल्काविरोधात निदर्शने करताना घाऊक धान्य, किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांच्यासह मनोज वडेरा, अशोक वैश्य, राकेश भंडारी, राजेश मालपुरे, पंकज लोढा, प्रसाद जाजू, श्याम दशपुत्रे, महेंद्र पटेल, सुरेश मंत्री, विजय काकड, राजन दलवाणी, नेमिचंद कोचर, रामनाथ मुंदडा, नीलेश पटेल आदी उपस्थित होते.

Web Title: Strict closure of grain and grocery traders in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.