कडक अंमलबजावणी : जिल्हा न्यायालयात 'नो मास्क, नो एंट्री'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 09:59 PM2021-02-22T21:59:31+5:302021-02-22T21:59:59+5:30
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सामाजिक अंतर राखणे, मास्कचा वापर, स्वच्छता राखणे, विनाकारण गर्दी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नाशिक : जिल्हा व सत्र न्यायालयात कोरोनाचा शिरकाव झाला असून शहरात देखील कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात ह्यनो मास्क नो एंट्रीह्ण नियम सोमवारपासून कडक करण्यात आला आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी न्यायालयाच्या आवारात येणाऱ्या वकिलांसह पक्षकारांना कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या उद्देशाने सूचना करत प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या परिसरात विनामास्क फिरताना कोणी आढळून आल्यास संबंधित व्यक्तीला ३०० रुपये तसेच आवारात थुंकताना आढळल्यास १ हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सामाजिक अंतर राखणे, मास्कचा वापर, स्वच्छता राखणे, विनाकारण गर्दी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, एका सरकारी वकिलांच्या कार्यालयाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आला आहे. न्यायालयात खबरदारी घेण्याच्या सूचना नाशिक बार असोसिएशनकडून करण्यात आल्या आहेत. त्यानुसार न्यायालयाच्या परिसरात येणाऱ्या प्रत्येकाने मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. कोरोनाची लक्षणे असणाऱ्या संशयितांना न्यायालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे. तसेच पास धारक वाहनांना परिसरातील वाहनतळात सोडण्यात येणार आहे. न्यायलयाच्या परिसरात पक्षकारांनी कामाशिवाय जास्त वेळ न थांबण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच बाररुम, वकिलांचे चेंबर्स येथे देखील सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.