सप्तशृंग गडावर प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 05:04 PM2018-10-08T17:04:30+5:302018-10-08T17:06:47+5:30
कळवण : उत्तर महाराष्ट्रचे आराध्य दैवत, साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या नवरात्रोत्सवाला रविवारी (दि.१०) घटस्थापनेने सुरुवात होत असून गुरुवार (दि.१८) आॅक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे . २३ व २४ आॅक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा, कावडयात्रोत्सव संपन्न होत आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय यंत्रणा, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.
कळवण : उत्तर महाराष्ट्रचे आराध्य दैवत, साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या नवरात्रोत्सवाला रविवारी (दि.१०) घटस्थापनेने सुरुवात होत असून गुरुवार (दि.१८) आॅक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे . २३ व २४ आॅक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा, कावडयात्रोत्सव संपन्न होत आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय यंत्रणा, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.
या नवरात्रोत्सवात प्लस्टीक बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून सप्तशृंगी निवासनी देवी ट्रस्टने देवी भक्तांच्या व भाविकांच्या सुरक्षितेसाठी सहा कोटी रु पयांचा अपघाती विमा उतरविला आहे. भगवती मंदिर परीसरात होणारी बोकड बळीची पारंपारीक प्रथा बंदच करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवात खासगी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे, नांदुरी येथून सप्तश्रुंग गडावर जाण्यासाठी दर ५ मिनिटाला परिवहन महामंडळाच्या बसेस भाविकासासाठी उपलब्ध राहणार आहेत. भाविकांच्या सोयी सुविधा व सुरक्षाविषयक जबाबदारी पार पडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंग गड व नांदुरी ग्रामपंचायत यात्रा कालावधीत भाविकांना सोई-सुविघा देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून देवीभक्त व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया, तहसीलदार कैलास चावडे यांनी केले आहे. राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी सप्तशृंगी निवासिनी देवी न्यासाने धर्मशाळेच्या खोल्या, राजराजेश्वरी इमारतीच्या खोल्या व सभागृह उपलब्ध करून दिले जाणार आहे. पहिल्या पायरीपासून मंदिराच्या सभामंडपापर्यंत साफसफाई व रंगरंगोटी करण्यात आली आहे. गाभारा, दरवाजे, चांदीची महिरप यावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. तसेच मेटल डिटेक्टर दरवाजे व हॅण्ड डिटेक्टरच्या तपासणीतून जावे लागणार आहे. एका मिनिटाला सर्वसाधारणपणे ६० ते ७० भाविक दर्शन घेवून बाहेर पडतील असे नियोजन करण्यात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर व परिसरात महत्वाच्या अनेक ठिकाणी सीसीटीवी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. नांदुरी ते सप्तंशृग गड दरम्यान एस टी बसची सोय करण्यात आली आहे. गडाच्या पायथ्याशी व गडावरील जलशुद्धीकरण केंद्राजवळील जागेत तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे. याठिकाणी पिण्याचे पाणी,प्रसाधनगृहाची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती सप्तश्रुंग निवासिनी देवी ट्रस्टच्या सूत्रांनी दिली .
२४ तास मंदीर खुले---
नवरात्रोत्सव कालावधीत श्री भगवती मंदीर भाविकांच्या दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्यात येणार आहे. भाविकांच्या मदतीसाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची स्थापना ट्रस्ट कार्यालयात करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षात सर्व विभागांचे प्रत्येकी एक अधिकारी २४ तास उपलब्ध राहणार आहेत. भाविकांसाठी नवरात्रोत्सव कालावधीत मोफत महाप्रसादाची व्यवस्था तर व्हीआयपींसाठी सशुल्क भोजन कक्ष सुरु करण्यात आला आहे अशी माहिती श्री सप्तशृंग निवासनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी दिली.
बोकड बळीची प्रथा बंदच---
पशुहत्या रोखण्यासाठी कोर्टानेच बंदी घातली असल्याने नवरात्रौत्सवाच्या सांगता दरम्यान विजयादशमीच्या दिवशी परंपरेनुसार भगवती मंदिरात परिसरामधील बोकड बळी व न्यासाच्या सुरक्षारक्षकाकडून बंदुकीची फैरी झाडण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे. मंदिर परिसरात बोकड बळी केल्यास त्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे.