गिरणारेत कडकडीत लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 09:45 PM2020-06-17T21:45:52+5:302020-06-18T00:26:28+5:30
गंगापूर : नाशिक तालुक्यातील गिरणारे येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्याने गावात अत्यावश्यक सेवा वगळता कडेकोट लॉकडाऊन पाळण्यात आला असून, पुढील दहा दिवस गावातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.
गंगापूर : नाशिक तालुक्यातील गिरणारे येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्याने गावात अत्यावश्यक सेवा वगळता कडेकोट लॉकडाऊन पाळण्यात आला असून, पुढील दहा दिवस गावातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.
गिरणारे हे आजूबाजूच्या ८२ खेड्यांची बाजारपेठ असल्याने गावात रोजच गर्दी असते. शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर गावातले सर्व व्यवहार नियमित सुरू झाले होते. तथापि, बुधवारी गावातील एका व्यावसायिकास कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. संबंधित कोरोना रुग्ण खासगी दवाखान्यात गेली काही दिवस उपचार घेत होता, त्याचे नमुने तपासणीसाठी दिले असता तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. त्याची वार्ता गावात कळताच सर्वांनी दक्षता घेत गावातील व्यवहार व व्यवसाय बंद केले. फक्त अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या असून, येत्या दहा दिवस गावातील दुकाने बंद राहतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, गावात बाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढली असून, त्यामुळेच कोरोनाचा फैलाव झाल्याची चर्चा होत आहे.
दरम्यान गिरणारेनजीकच्या एका खेड्यातही ३ दिवसांपूर्वी कोरोना रुग्ण सापडला असल्याने ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.