चोख गस्त अन् कारवाई : शहरात आता पोलिसांचा ‘नाइट कर्फ्यू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 07:43 PM2020-06-30T19:43:23+5:302020-06-30T19:52:33+5:30
पोलीस गस्तीदरम्यान संचारबंदी, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन तसेच मास्कचा वापर न करत वावरणारे लोक व सामाजिक अंतर न राखणा-यांविरूध्द कायद्याचा बडगा उगारला जाणार
नाशिक : शहर व परिसरात सातत्याने कोरोनाचे संक्रमण वेगाने सुरू आहे. आतापर्यंत महापालिका हद्दीत कोरोनाबाधितांची संख्या सुमारे २ हजार ८०० इतकी झाली आहे. ‘मिशन बिगीन अगेन’ जरी सुरू असले तरीदेखील लॉकडाऊनचा कालावधी ३१ जुलै करण्यात आल्याने आता पोलीस आयुक्तालयाकडून शहरात चोखपणे ‘नाइट कर्फ्यू’ची अंमलबजावणी करण्याचे आदेश (दि.३०) देण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर पोलिसांनीही पुन्हा कंबर कसली आहे. नव्याने बंदोबस्त व कारवाईची आखणी केली आहे. जमावबंदी, संचारबंदीचे नियम अधिक कठोर करण्यासाठी शहर पोलिसांनी ‘‘मिशन बिगीन अगेन’’ ही मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत संध्याकाळनंतर रात्री उशिरापर्यंत विनाकारण रस्त्यांवर पायी फिरणारे लोक तसेच दुचाकीस्वारांवर नाकाबंदी व गस्तीदरम्यान कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी संध्याकाळनंतर घराबाहेर पडू नये, असे आवाहन वारंवार केले जात आहे. जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीही याबाबत आदेश पारित केले आहेत. यानुसार संध्याकाळी सात वाजेच्यापुढे नागरिकांनी कुठल्याही अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर येऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूध्द पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सर्व पोलीस ठाण्यांना आपआपल्या हद्दीत कडक कारवाई करण्याचे फर्मान काढले आहे.
दरम्यान, शहरात आता संध्याकाळपासून पोलीस कठोर भूमिका घेणार असून नाकाबंदीचे पॉइंट पुन्हा अॅक्टिव करणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलीस गस्तीदरम्यान संचारबंदी, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन तसेच मास्कचा वापर न करत वावरणारे लोक व सामाजिक अंतर न राखणा-यांविरूध्द कायद्याचा बडगा उगारला जाणार आहे. एकूणच पोलीस आता पुन्हा सक्तीने संध्याकाळनंतर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे नागरिकांनी रात्रीची शतपावली व सकाळी सहा वाजेपुर्वीचा फेरफटका मारणे पुर्णपणे टाळावे जेणेकरून कारवाईला सामोरे जावे लागणार नाही.
जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी परवानगी गरजेची
नाशिक जिल्ह्यातून बाहेर प्रवास करावयाचा असल्यास पोलीस आयुक्तालयाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. आयुक्तालय हद्दीत राहणाºया लोकांनी जिल्हाबाहेर जाण्यापुर्वी ‘कोरोना सेल’शी संपर्क साधून आवश्यक ती माहिती भरून अर्ज सादर करून ‘प्रवास परवाना’ प्राप्त करून घ्यावा. तसेच ग्रामिण भागात राहणा-या नागरिकांनी जिल्हा सोडण्यापुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातून परवानगी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
....या नियमांचे पालन अनिवार्यच!
१.एका दुचाकीवर केवळ एकच व्यक्तीला प्रवासाची मुभा.
२.चारचाकी वाहनात चालकासह तीघा व्यक्तींना मुभा.
३.घराबाहेर पडताना मास्कचा वापर आवश्यक
४.विनाकारण घराबाहेर वाहने घेऊन मिरवू नये.
५. दुकानांवर जाताना ‘डिस्टन्स’ बाळगावा
६. सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यांवर धुम्रपान, मद्यप्राशन करू नये व थूंकू नये.
७.हॉटेल, रेस्टॉरंट, लॉज, मोकळ्या भुखंडांवर ‘पार्टी’ करू नये.