जिल्ह्यात आजपासून कडक निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:15 AM2021-05-12T04:15:51+5:302021-05-12T04:15:51+5:30
नाशिक जिल्ह्यात कोरेानाची दुसरी लाट अत्यंत तीव्र होती. आता रुग्णसंख्या कमी हेात असली, तरी स्थिती पूर्णत: नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा ...
नाशिक जिल्ह्यात कोरेानाची दुसरी लाट अत्यंत तीव्र होती. आता रुग्णसंख्या कमी हेात असली, तरी स्थिती पूर्णत: नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाने सोमवारी (दि.१०) झालेल्या बैठकीत बारा दिवसांचे कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, १२ मे रोजी दुपारी बारा वाजेपासून २३ तारखेच्या रात्री बारा वाजेपर्यंत निर्बंध लागू राहणार आहेत. औषधालये आणि किराणा दुकानांना परवानगी असली, तरी किराणा दुकानदारांना दुपारी वाजेपर्यंत मुभा असून, त्यातही ग्राहकांना प्रत्यक्ष माल न देता घरपोच देण्याची व्यवस्था करावी लागणार आहे.
दरम्यान, या निर्बंधांबाबत काही शंका उपस्थित झाल्याने पालकमंत्री छगन भुजबळ, तसेच मदत व पुनर्वसन सचिव यांच्याशी चर्चा केल्यानंतर अनेक शंका दूर करण्यात आल्या असून, काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे.
ग्राहकांना खरेदीसाठी जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानात जाण्यास प्रतिबंध असला, तरी त्यांना अशा सर्व वस्तू घरपोच आणण्याचा पर्याय खुले ठेवण्यात आला आहे. याशिवाय भाजी विक्रीची वेळ सकाळी ७ ते दुपारी १२ अशी निश्चित करण्यात आली असली, तरी त्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्र आदेश जारी करणार आहे. मात्र, भाजीबाजारात नियमांचे उल्लंघन झाल्यास दहा दिवस त्या ठिकाणी विक्री बंद करण्यात येणार आहे.
दूधविक्री घरपोच करण्याचे आदेश असले, तरी सकाळी ७ ते १२ या वेळात पूर्णत: दूधविक्री शक्य नसल्याने, सायंकाळी ५ ते ७ या वेळेत स्थानिक स्वराज्य संस्था निश्चित करेल, अशा ठिकाणाहून विक्री करता येईल. मात्र, येथेही नियमांचे उल्लंघन झाल्यास दहा दिवसांकरिता विक्री बंद ठेवण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
इन्फो...
शेतमाल विकेंद्रित स्वरूपात स्वीकारण्याची मुभा
बाजार समित्यांमधील गर्दी नियंत्रित करता येत नसल्याने, त्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र, शेतकऱ्यांकडील भाजीपाला आणि अन्य माल स्वीकृत करण्यासाठी विकेंद्रित व्यवस्था तयार करण्याचे निर्देशही बाजार समित्यांना देण्यात आले आहेत. शहरांतर्गत आणि राज्यांतर्गत शेतमाल वाहतुकीस कोणताही प्रतिबंद करण्यात आलेला नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
इन्फो..
अटीशर्तींवर उद्याेग सुरू राहणार
ज्य उद्योगांमध्ये कामगारांची निवास आणि भोजन व्यवस्था असेल, अशाच उद्योगांना सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता ज्या कारखान्यात अशी सोय नसेल, अशा काही कारखानदारांनी एकत्र येऊन त्या उद्योगाच्या दोन किलाेमीटर क्षेत्रात कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था केल्यास, कमी मनुष्यबळात उद्याेग सुरू राहू शकतील, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ऑक्सिजन निर्मिती आणि औषधे तयार करणारे उद्योग सुरू राहतील, त्यांच्या कामगारांनी ओळखपत्र जवळ ठेवणे आवश्यक राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.