एकलहरे वीज केंद्र वसाहतीत कडक नियम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:13 AM2021-04-10T04:13:55+5:302021-04-10T04:13:55+5:30
एकलहरे वीज केंद्र वसाहत व परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. त्यात काहींचा मृत्यू झाला. या अनुषंगाने येथील मुख्य अभियंत्यांनी ...
एकलहरे वीज केंद्र वसाहत व परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. त्यात काहींचा मृत्यू झाला. या अनुषंगाने येथील मुख्य अभियंत्यांनी परिपत्रक जारी करून अभियंते, कामगार, कंत्राटदार, कंत्राटी कामगार, वीज केंद्र वसाहतीतील नागरिक व व्यावसायिकांना कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना व नियमांचे पालन करणे गरजेचे म्हटले आहे. ‘मी जबाबदार’ या संकल्पनेअंतर्गत वसाहतीतील कोरोना संक्रमित नागरिकांनी स्वतः तसेच परिवारातील सदस्यांनीदेखील खबरदारीच्या दृष्टीने विलगीकरण कालावधी पूर्ण करणे, अशा संक्रमित व्यक्तींनी वसाहतीत मुक्तपणे संचार करू नये, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्य अभियंता यांनी काढलेल्या परिपत्रकात देण्यात आला आहे. ज्या इमारतीमध्ये ४ किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती कोरोनाबाधित अथवा विलगीकरण कालावधीत असल्यास त्या इमारतीबाहेर सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.