काटेकोर गावबंदी ठरली निर्णायक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 10:37 PM2020-06-12T22:37:40+5:302020-06-13T00:09:37+5:30
नाशिक : जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या मालेगाव आणि नाशिक शहरात आहे. मात्र, मालेगाव महानगरातून नजीकच्या ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव होऊ लागल्यावर तेथील नागरिकांनी अत्यंत काटेकोरपणे गावबंदीचे आणि संचारबंदीचे पालन केले. तसेच ग्रामीण भागातील लोकसंख्येची घनतादेखील कमी असल्यामुळेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची संख्या फारशी वाढलेली नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
नाशिक : जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या मालेगाव आणि नाशिक शहरात आहे. मात्र, मालेगाव महानगरातून नजीकच्या ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव होऊ लागल्यावर तेथील नागरिकांनी अत्यंत काटेकोरपणे गावबंदीचे आणि संचारबंदीचे पालन केले. तसेच ग्रामीण भागातील लोकसंख्येची घनतादेखील कमी असल्यामुळेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची संख्या फारशी वाढलेली नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
नाशिक महापालिका हद्दीत गुरुवारपर्यंत ५१६, तर मालेगाव मनपा क्षेत्रात ८६२ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील सर्वाधिक बाधित लोकसंख्या ही या दोन महानगरपालिकांच्या हद्दीतील असून, सध्याच्या स्थितीतही या दोन्ही मनपा हद्दीतच रुग्णवाढीचे प्रमाण अधिक आहे. ज्यावेळी रावळगाव, द्याने, पिंपळगाव अशा मालेगावच्या परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला, त्यावेळी तेथील ग्रामस्थांनी मिळून तीन दिवसांच्या गावबंदीची एकदम कोटेकोरपणे अंमलबजावणी केली. त्यामुळे त्या गावांमध्ये रुग्णसंख्या वाढीला आळा बसला. तसेच ग्रामीण भागात घरेदेखील विखुरलेली असल्याने कोरोनाग्रस्तांचा इतरांना संसर्ग होण्याचे प्रमाणदेखील खूप न वाढता नियंत्रणात राहिले. त्याशिवाय मालेगाव शहरात धर्मगुरू, मौलानांच्या उपस्थितीत घेतलेल्या बैठका, त्यांनी केलेली आवाहनेदेखील परिणामकारक ठरली. नागरिकांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग तसेच मास्क वापराबाबत खबरदारी घेण्याच्या प्रमाणात अधिक चांगल्याप्रकारे झालेली जागृती ग्रामीण भागातील फैलाव रोखण्याच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरत आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये प्रारंभीच्या टप्प्यात रुग्ण आढळून आले आणि ज्या गावांनी त्यानंतर कठोर गावबंदीचे धोरण राबविले त्या गावांना, तालुक्यांच्या शहरांना त्याचा फायदाच झाल्याचे आढळून येत आहे.
-------------------------
मृत्यूदरातील घट दिलासादायक
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर सर्वाधिक मृत्यू हे मालेगाव महानगरातील होते. त्यानंतरच्या काळात प्रभावी उपाययोजना आणि मालेगावमधील जनतेने प्रबोधन मनावर घेतल्याने तेथील प्रादुर्भाव आणि मृत्यूदरातदेखील घट आली असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
-------------------मालेगावसह ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरवणाऱ्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनादेखील या विविध गावांमधील गावबंदी, नाकेबंदीचा अनुभव आला. काही ठिकाणी तर आरोग्य कर्मचाºयांनादेखील गावात घेण्यात आले नव्हते. कोरोना झाल्यानंतर त्यावर आरोग्याच्या उपाययोजना करण्यापेक्षा त्यापूर्वीच खबरदारी घेणे केव्हाही अधिक परिणामकारक असते.
- डॉ. योगेश पाटील, आरोग्य अधिकारी, सामान्य रुग्णालय, मालेगाव