अधिकाऱ्यांच्या दालनात संतप्त महिलांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:43 AM2019-06-04T00:43:52+5:302019-06-04T00:44:15+5:30
मुबलक पाणीसाठा असताना केवळ पाणीपुरवठा विभागातील दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या श्रेयवादावरून राणेनगर भागातील प्रभाग क्रमांक ३१ मधील सदिच्छानगर भागासह परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पिण्यापुरतेही पाणी मिळत नाही.
सिडको : मुबलक पाणीसाठा असताना केवळ पाणीपुरवठा विभागातील दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या श्रेयवादावरून राणेनगर भागातील प्रभाग क्रमांक ३१ मधील सदिच्छानगर भागासह परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पिण्यापुरतेही पाणी मिळत नाही.
महापालिकेला वारंवार सांगूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने गेल्या रविवारी (दि.२) संतप्त नागरिकांनी व्हॉल्वमनला घेराव घातला. परंतु यानंतरही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने सोमवारी शिवसेनेचे नीलेश सोळुंखे व बाळासोहब काळे यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छानगर भागातील महिला व नागरिकांनी थेट मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयावर मोर्चा काढत पाणीपुरवठा अधिकारी दौलत घुले यांच्या दालनात ठिय्या मांडत जोपर्यंत पाणीप्रश्न सुटत नाही तोपर्यंत येथून जायचेच नाही, असा पवित्रा घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
यानंतर मोर्चेकºयांनी पाणीप्रश्न सुटावा यासाठी सिडको प्रभाग सभापती हर्षा बडगुजर यांच्या दालनात जाऊन मनपा विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांना निवेदन दिले. यावेळी उपस्थित महिला व नागरिकांनी पाणीपुरवठा अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे सदिच्छानगर भागातील पाणीप्रश्न गंभीर बनला असल्याचा आरोप केला. यावेळी सुधाकर बडगुजर यांनी पाणीपुरवठा अधिकारी दौलत घुले, कनिष्ठ अभियंता गोकुळ पगारे तसेच व्हॉल्वमन यांना बोलावून घेत सदिच्छानगरचा पाणीप्रश्न त्वरित सुरळीत करण्याचे सांगितले. तसेच पाणीप्रश्न सुरळीत न झाल्यास महिला व नागरिकांना बरोबर घेत आंदोलन करण्याचा इशाराही दिला. यावेळी नीलेश साळुंखे, बाळासाहेब काळे, वंदना काळे, जयश्री गावडे, योगीता गावडे, छाया काकड, सुगंधा भोये, रेणुका गाडेकर, सुमन भिसे, संध्या ठाकरे, रुपाली मोरे, सरस्वती मोरे, उषा पाटील, सुलोचना पाटील, नंदा गायकवाड, अनिता वाजे आदी उपस्थित होते.
अधिकाºयांचा नियोजनशून्य कारभार
एकीकडे सिडको भागात मुबलक पाणीपुरवठा होत असून, नागरिक पाण्याची नासाडी करीत असल्याचे चित्र बघावयास मिळते तर दुसरीकडे सदिच्छानगर भागातील रहिवाशांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नाही. शहरालगत असलेल्या ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांना दिवस-रात्र एक करावा लागत असून, त्या ठिकाणी पाणीच नाही. परंतु सिडकोसह परिसरात मुबलक पाणीपुरवठा होत असताना केवळ मनपाच्या पाणीपुरवठा अधिकाºयांच्या नियोजनशून्य कारभारामुळे सदिच्छानगर भागात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
सिडको प्रभाग क्रमांक ३१ मधील सदिच्छानगर भागासह परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून येथील रहिवाशांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याने महिलावर्गात मनपाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभाराबाबत तीव्र संताप परसला आहे.
सिडकोतील काही भागाला तसेच सदिच्छानगर भागात शिवाजीनगर तसेच मुकणे येथून पाणीपुरवठा केला जात असून, पाणीसाठा मुबलक असताना केवळ कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण व शिवाजी चव्हाणके या दोघांमधील कामकाजाच्या श्रेयवादावरून सदिच्छानगरसह परिसरात गेल्या दहा दिवसांपासून पिण्यापुरतेही पाणी मिळत नाही. पाणीप्रश्न सुरळीत करण्यासाठी मनपा आयुक्तांची भेट घेणार आहे. - सुधाकर बडगुजर, मनपा विरोधी पक्षनेते