आरोपांवर ठाम : महासभेत विचारणार जाब डस्टबिन खरेदी घोटाळा, शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:13 AM2017-12-18T01:13:00+5:302017-12-18T01:13:40+5:30
स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत महापालिकेने खरेदी केलेल्या डस्टबिन खरेदीत घोटाळा झाल्याच्या आरोपावर शिवसेना ठाम असून, आरोग्याधिकाºयांनी केलेल्या स्पष्टीकरणानंतर पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
नाशिक : स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत महापालिकेने खरेदी केलेल्या डस्टबिन खरेदीत घोटाळा झाल्याच्या आरोपावर शिवसेना ठाम असून, आरोग्याधिकाºयांनी केलेल्या स्पष्टीकरणानंतर पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी शहरात लावण्यात आलेल्या डस्टबिनची माहिती मागवून महापालिकेने सदर डस्टबिन खरेदीवर अव्वाच्या सव्वा रक्कम मोजल्याचा आरोप केला आहे.
शिवसेनेने अतिरिक्त आयुक्त व आरोग्याधिकारी यांना डस्टबिन भेट देत महापालिकेने केलेल्या डस्टबिन खरेदीतील तफावत निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर, आरोग्याधिकारी डॉ. बुकाणे यांनी पत्रक प्रसिद्धीस देत शिवसेनेने भेट दिलेल्या डस्टबिन या कमी थिकनेस असलेल्या आणि हेवी ड्युटी नसलेल्या, इंजेक्शन मोल्डेड असल्याचे स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी शनिवारी (दि.१६) शहरात बसविण्यात आलेल्या डस्टबिनची इत्यंभूत माहिती मागविली. याशिवाय, त्याबाबत तज्ज्ञांकडूनही मते मागविली. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना बोरस्ते यांनी सांगितले, महापालिकेने खरेदी केलेल्या डस्टबीन या २१.६५ इंचाच्या होत्या, तर सेनेने भेट दिलेल्या डस्टबिन या २७.५५ इंचाच्या होत्या. महापालिकेने खरेदी केलेल्या डस्टबिनचा व्यास १३ इंच, तर शिवसेनेने भेट दिलेल्या डस्टबिनचा व्यास १४.९६ इंच इतका आहे. महापालिकेने खरेदी केलेल्या दोन्ही डस्टबिनची किंमत ३,६०० रुपये आहे, तर सेनेने खरेदी केलेल्या त्यापेक्षा उच्च दर्जाच्या डस्टबिनची किंमत जीएसटीसह २,३०४ रुपये आहे. बाहेर स्टॅण्डसाठी १,५३८ रुपये खर्च येतो, मात्र महापालिकेने त्यासाठी १,८२० रुपये खर्च दाखविला आहे, तर साखळी-कुलुपासह मजुरी म्हणून २,३५० रुपये दाखविलेले आहे. उच्च दर्जाचे मटेरियल मागवले तरी सारा खर्च पाच हजारांच्या पुढे जात नाही. मात्र, महापालिकेने ११ हजार रुपये मोजले आहेत. याबाबत येत्या महासभेत शिवसेना आणखी आक्रमक भूमिका घेणार असल्याचेही बोरस्ते यांनी स्पष्ट केले.