ऐन गणेशोत्सवात नाशिकमधील सीटी लिंकच्या २०० बसेस बंद, शहर वाहतूक ठप्प; प्रवाशांचे हाल
By संजय पाठक | Published: September 1, 2022 08:30 AM2022-09-01T08:30:53+5:302022-09-01T08:32:42+5:30
महानगरपालिकेच्या सिटी लिंक बस सेवेच्या 200 बस आज सकाळपासून वाहकांच्या संपामुळे बंद झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
महानगरपालिकेच्या सिटी लिंक बस सेवेच्या 200 बस आज सकाळपासून वाहकांच्या संपामुळे बंद झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.
वाहकांच्या वेग वेगळ्या मागण्यांसाठी त्यांनी काम बंद आंदोलन पुकारले असून तिढा सोडवण्यासाठी उपमहाव्यवस्थापक (वाहतूक) मिलिंद बंड हे चर्चेसाठी नाशिकरोड आगरात रवाना झाले आहेत नाशिक महानगर परिवहन महामंडळ या कंपनीच्या माध्यमातून महापालिका शहर बस वाहतूक सेवा गेल्या वर्षी आठ जुलैपासून देत आहे सकाळच्या सत्रात दोनशे तर दुपारच्या सत्रात दोनशे अशा सुमारे चारशे बसेस ठेकेदारांमार्फत चालवल्या जातात मात्र महापालिकेच्या कंपनीचे धोरण अत्यंत जाचक असल्याचा वाहकांचा आरोप आहे.
बसमध्ये प्रवास करताना तिकीट काढण्यास विलंब झाल्यास अथवा गर्दीमुळे तिकीट काढणे शक्य नसल्यास किंवा एखादा प्रवासी हा निर्धारित थांबण्यापेक्षा पुढील थांब्यावर उतरल्यास वाहन चालकांना जबाबदार धरून तीन ते पाच हजार रुपये दंड तसेच निलंबनाची कारवाई केली जाते. तिकीट चेकरचा वेगळा ठेका असल्याने ही कारवाई केली जाते. आता पर्यँत 65 वाहक निलंबित करण्यात आले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून या संदर्भात वाहक दाद मागत आहेत मात्र कंपनीकडून कोणत्या प्रकारची दखल घेतली जात नाही या प्रकारामुळे आज सकाळपासून नाशिक रोड आणि पंचवटी या दोन्ही आगारातून बाहेर पडणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत. काल गणेशोत्सवाची सुटी तर आज कामकाजाचा दिवस असल्यामुळे सकाळी शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी तसेच कर्मचारी कामगार वर्ग आणि अन्य प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
वाहकांचे कंत्राट असलेले ठेकेदार सचिन भोसले तसेच अन्य अधिकारी या दोन्ही त्रिकोण मध्ये दाखल आहेत दाखल झाले आहेत उपमहा व्यवस्थापक वाहतूक मिलिंद बंड हे नाशिकरोड येथे रवाना झाले असून लवकरच बसेस सुरू होतील असं त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं.