‘बेमोसमी’चा दुसऱ्या दिवशीही तडाखा

By admin | Published: November 22, 2015 11:42 PM2015-11-22T23:42:08+5:302015-11-22T23:42:51+5:30

ढगाळ वातावरण : दुपारनंतर जोरदार हजेरी; शहरात वाढला गारठा

Strike 'Bemosami' on the next day | ‘बेमोसमी’चा दुसऱ्या दिवशीही तडाखा

‘बेमोसमी’चा दुसऱ्या दिवशीही तडाखा

Next

नाशिक : आग्नेय व पूर्वमध्य अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे झालेल्या बेमोसमी पावसाने शहरात रविवारी दुसऱ्या दिवशीही जोरदार हजेरी लावली. शनिवारी ५.२ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. दोन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण कायम असून, त्यामुळे किमान तपमानात वाढ झाली. दरम्यान, काल रविवार असूनही पावसामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले.
गेल्या काही दिवसांपासून थंडीत हळूहळू वाढ होत होती. शुक्रवारी तर शहराचे किमान तपमान राज्यात नीचांकी ११.५ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते; मात्र शनिवारपासून अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि सायंकाळी सात वाजेच्या सुमारास धुव्वाधार पावसाने तडाखा दिला. शहराच्या सर्व भागांत सुमारे दीड तास पाऊस सुरू होता. पेठ रोड येथील हवामान केंद्रात शनिवारी ५.२ मि. मी. पावसाची नोंद झाली. काल रविवार सकाळपासूनच ढगाळ वातावरण कायम होते.
दुपारी तीन वाजेनंतर शहराच्या काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे रस्त्यावरील विक्रेत्यांचे चांगलेच हाल झाले. शहराच्या सखल भागांत तसेच रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे रविवार असूनही कालबाजारपेठेत शुकशुकाट
दिसून येत होता. शनिवारचा
अनुभव लक्षात घेऊन नागरिक रेनकोट, छत्र्या घेऊनच घराबाहेर पडत होते.
दरम्यान, पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण तसेच पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नाशिकच्या धरणांतून मराठवाड्यातील जायकवाडी धरणाला पाणी दिल्याने नाशिककरांपुढे पाणीकपातीचे संकट उभे ठाकल्याचे बोलले जाते. त्यामुळे या बेमोसमी पावसाने तरी दिलासा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

तपमान २० अंशांवर

ढगाळ वातावरणामुळे शहराच्या किमान तपमानात वाढ झाली आहे. शुक्रवारी ११.५ अंशांपर्यंत घसरलेले तपमान शनिवारी १६.४ अंशांवर पोहोचले, तर रविवारी पहाटे ते २०.२ इतके नोंदवण्यात आले. पावसामुळे तात्पुरता गारवा निर्माण झाला असला, तरी ढगाळ वातावरणामुळे तपमान वाढल्याचे हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: Strike 'Bemosami' on the next day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.