अतिक्रमण पथकाला धक्काबुक्की
By admin | Published: March 2, 2016 10:54 PM2016-03-02T22:54:42+5:302016-03-02T22:56:29+5:30
सिन्नर : कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा
सिन्नर : अनधिकृत रसवंती गृह हटविण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करीत शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन महिन्यांपासून अनधिकृत अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यात येत आहे. गणेश पेठेतील अशोकनगर भागातील मोकळ्या जागेत असलेल्या रसवंतीगृह चालकास अतिक्रमण हटविण्याबाबत सूचना देण्यात आली होती. तथापि, त्यांनी तसे न केल्याने मंगळवारी सकाळी अतिक्रमण विरोधी पथक रसवंती गृहाचे अतिक्रमण हटविण्यासाठी गेले होते. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण हटविण्यास प्रारंभ केला असता रसवंतीगृह चालक राहूल गायकवाड याने त्यांना विरोध करत शिवीगाळ व दमबाजी करण्यास सुरुवात केल्याचे अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख रुपेन शिंदे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी राहूल गायकवाड व त्याचा मित्र व मयूर खालकर हा त्याठिकाणी आला. कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की करण्यास प्रारंभ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे अतिक्रमण निर्मुलन पथकास अतिक्रमण न हटविताच तेथून जाणे भाग पडले. शिंदे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी रसवंतीगृह चालक राहूल गायकवाड व मयूर खालकर या दोघांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)