पंचवटीत डिस्टन्सिंगच्या नियमांना हरताळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 10:23 PM2020-05-06T22:23:24+5:302020-05-07T00:00:58+5:30
पंचवटी : नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन जीवनावश्यक वस्तूंसह बहुतांश सर्वच दुकाने सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिल्याने बाजारपेठ खुली झाली असून, पंचवटीत दोन दिवसांपासून फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे आढळून आले आहे.
पंचवटी : नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन जीवनावश्यक वस्तूंसह बहुतांश सर्वच दुकाने सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिल्याने बाजारपेठ खुली झाली असून, पंचवटीत दोन दिवसांपासून फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे आढळून आले आहे. पंचवटी परिसरात पेट्रोलपंप असो की कपड्याची दुकाने, दूध केंद्र, भाजीपाला दुकाने याठिकाणी कोणत्याही प्रकारच्या नियमांचे
पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर विशेष प्रयत्न केले जात असताना नागरिकांनी मात्र शासनाच्या नियमाला केराची टोपली दाखवली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी पोलिसांकडून रस्त्याने विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात होती, मात्र आता पोलिसांनी कारवाई मागे घेतल्याने सकाळी, सायंकाळी फिरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
पंचवटी परिसरात बुधवारच्या दिवशी अनेक व्यावसायिकांनी सकाळी आपापली दुकाने उघडली त्यावेळी विविध वस्तू खरेदीसाठी शेकडो नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतल्याने काही वेळ लोकांमध्ये सूट दिल्याचे चित्र बघायला मिळाले. परिसरात असलेले कपड्याचे दुकान, मिठाई दुकान, हॉटेल, चप्पल दुकान, सलून या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. विशेष म्हणजे विविध दुकानांमध्ये संबंधित दुकानदार व खरेदीसाठी आलेल्या नागरिकांकडूनदेखील कोणत्याही प्रकारे फिजिकल डिस्टन्सचे पालन केले जात नव्हते.
------
४शासनाने सर्व दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी दिली त्याचा फायदा घेत अनेक व्यावसायिकांनी नेहमीप्रमाणे दुकाने सुरू केल्याने गर्दी वाढली आहे. त्यामुळे धोकादेखील अधिक वाढला आहे. बुधवारी दिवसभर शहरातील मेनरोड, रविवार कारंजा, जुने नाशिक भागासह अनेक ठिकाणी नागरीकांची गर्दी दिसुन आली. दुचाकीवर एकच व्यक्ती असावा अशा सूचना असल्या तरी अनेक ठिकाणी या नियमाला हरताळ फासला जात असल्याचे चित्र पहावयास मिळाले.