नाशकात अतिक्रमण विभागाच्या वाहनासमोर विक्रेत्यांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 07:21 PM2018-03-05T19:21:04+5:302018-03-05T19:21:04+5:30
फूलविक्रेत्यांचे आंदोलन : पालिकेकडून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
नाशिक - महापालिकेने फूलबाजार, सराफबाजार परिसरात रस्त्याच्या दुतर्फा बसलेल्या फूलविक्रेत्यांविरुद्ध सोमवारी (दि.५) पुन्हा एकदा कारवाई सुरू केल्यानंतर संतप्त झालेल्या विक्रेत्यांनी अतिक्रमण विभागाचे वाहन अडवत त्यासमोर ठिय्या मांडला. जप्त केलेला माल परत मिळावा यासाठी आंदोलन करणा-या चौघांविरुद्ध महापालिकेने तक्रार दिल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले आहे.
महापालिकेकडून शहरात रस्त्यावर व्यवसाय करणा-या विक्रेत्यांविरूद्ध जोरदार मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. फेरीवाले यांच्यासह रस्त्यात मांडलेल्या टप-या हटविण्याची कारवाई सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम विभागातील फूलबाजार, सराफबाजार परिसरात रस्त्यांवर व्यवसाय करणा-या फूलविक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाऊन त्यांचा माल जप्त केला जात आहे. महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक सोमवारी (दि.५) विभागीय अधिकारी नितीन नेर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी फूलबाजारात जाऊन धडकले. यावेळी, पथकाकडून विक्रेत्यांचा माल जप्त करण्यास सुरूवात झाली. यावेळी, काही विक्रेत्यांनी त्यास विरोध दर्शविला तर काही विक्रेत्यांनी आक्रमक भूमिका घेत अतिक्रमण विभागाच्या वाहनासमोरच ठिय्या मांडला. त्यात महिला विक्रेत्यांचाही मोठा सहभाग होता. जप्त केलेला माल परत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याचवेळी काही विक्रेत्यांनी जमाव जमवत आंदोलनाचा पवित्रा घेतला.त्यामुळे विभागीय अधिका-यांनी सरकारवाडा पोलिसांना फोन करुन जादा कुमक मागवून घेतली. यावेळी, महापालिकेचे वाहन अडवून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी रविंद्र सावळीराम दिवे, कल्पेश माधवराव रासकर, शेखर माधवराव रासकर आणि पप्पू सुरेश लोखंडे यांच्याविरूद्ध सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. मनपाच्या तक्रारीवरून पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या कारवाईत महापालिकेने सुमारे ३ ट्रक साहित्य जप्त केले. दुपारच्या सत्रात सीबीएस मेघदूत शॉपिंग सेंटर तसेच टॅक्सी स्टॅँड परिसरातीलही अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी सुमारे १५ दुकानांचे पुढे आलेले ओटे, शेड व टप-या हटविण्यात आल्या. यावेळी, महापालिकेची पाच पथके तैनात होती.