धडक कारवाई : माजी नगरसेवक-अधिकारी यांच्यात शाब्दिक वाद त्रिमूर्तीतील अतिक्रमणांवर घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 01:48 AM2018-03-02T01:48:04+5:302018-03-02T01:48:04+5:30
सिडको : महापालिकेच्या वतीने सिडको भागातील रहदारीस अडथळा ठरणारे मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले.
सिडको : महापालिकेच्या वतीने सिडको भागातील रहदारीस अडथळा ठरणारे मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची धडक मोहीम सुरू असून, गुरुवारी दिव्या अॅडलॅब, दुर्गानगर, फे्रशअप बेकरीसमोरील तसेच उत्तमनगर ते विजयनगर रस्त्यासह सुमारे दोनशेहून अधिक व्यावसायिकांचे अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले. अतिक्रमण काढताना माजी नगरसेवक व अधिकारी यांच्यात शाब्दिक वाद झाला. या अतिक्रमण निमूर्लन मोहिमेमुळे मुख्य रस्ते मोकळे झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. महापालिकेच्या वतीने विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसांपासून सिडको भागातील मुख्य चौक व रस्त्यांचे अतिक्रमण काढण्याची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. सुरुवातील मनपाने त्रिमूर्ती चौक येथील मुख्य रस्त्याला अडथळे ठरणारी अतिक्रमणे काढली. यानंतर पवननगर ते उत्तमनगर या भागातील मुख्य रस्त्यावरील दुकानदारांनी केलेले अतिक्रमण हटविले. गुरुवारी मनपाने दिव्या अॅडलॅब परिसरातून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. यावेळी माजी नगरसेवक पुंजाराम गामणे यांच्या दुकानापर्यंत पथक आल्यानंतर गामणे यांनी सदरचे दुकान हे सिडको प्रशासनाकडून विकत घेतले असून, कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण केले नसल्याचा दावा केला. मात्र यानंतर याठिकाणी दाखल झालेले सिडकोचे प्रशासक अनिल झोपे यांनी सदरच्या दुकानाबाहेरील अतिक्रमण करण्यात आलेली जागा ही सार्वजनिक असल्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर मनपाने याठिकाणचे अतिक्रमण हटविले. यावेळी मनपा अधिकारी व माजी नगरसेवक पुंजाराम गामणे यांच्यात शाब्दिक वाद झाला. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने वाद मिटला व लगेचच येथील अतिक्रमण हटविण्यात आले. यानंतर मनपाने आपला मोर्चा दुर्गानगर फ्रेशअप बेकरीसमोरील दुकानांकडे वळविला. यावेळी येथील मुख्य रस्त्याला अडथळा ठरणाºया पंचवीसहून अधिक व्यावसायिकांचे अतिक्रमण हटविले. यानंतर दुपारी ही मोहीम उत्तमनगर ते विजयनगर या भागात राबविण्यात आली. गेल्या अनके वर्षांपासून असलेले अतिक्रमण मनपाने काढल्यानंतर रस्ते मोकळे झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मनपाच्या वतीने अतिक्रमण काढण्यास सुरुवात करताच परिसरातील अन्य दुकानदार स्वत:हून आपले अतिक्रमण हटवित असल्याचे दिसून आले. यावेळी अतिक्रमण काढताना बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी मनपाने दोनशेहून अधिक दुकानदारांनी केलेले अतिक्रमित पत्र्याचे शेड, ओटे तसेच जाहिरात फलक, बॅनर, दुकानाचे बोर्ड व काही ठिकाणचे पक्के बांधकाम काढण्यात आले. मनपाच्या विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत, सहायक अधीक्षक अंकुश आंबेकर, अतिक्रमण सिडको विभागाचे प्रमुख जीवन ठाकरे आदींच्या उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत जेसीबी
यंत्र, दोन अतिक्रमण पथक, दोन टॅक्टर व सुमारे पन्नासहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते.