वाळू माफीयांची तलाठ्यास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 04:12 PM2018-10-11T16:12:36+5:302018-10-11T16:12:54+5:30
देवळा : तालुक्यात गिरणा नदीपात्रात वाळू माफीयांनी केलेल्या बेदम मारहाणीत तलाठ्याची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांना उपचारासाठी नासिक येथे जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
देवळा : तालुक्यात गिरणा नदीपात्रात वाळू माफीयांनी केलेल्या बेदम मारहाणीत तलाठ्याची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांना उपचारासाठी नासिक येथे जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनेच्या निषेधार्थ देवळा तालुक्यातील तलाठी व कोतवालांनी काम बंद आंदोलन सुरू केले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तहसिलदार देवळा यांच्या आदेशानुसार महसूल विभागाच्या गस्ती पथकाने गुरु वारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास लोहोणेर हद्दीत गिरणा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूची वाहतुक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले. तलाठी अंबादास रामदास पुरकर यांनी आपल्या मोबाईलने हया ट्रॅक्टरचे व्हिडीओ चित्रिकरण करण्याचा प्रयत्न केला असता १५ ते २० अज्ञात व्यक्तिंनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेत त्यांना लाथाबुक्यांनी व फ़ावड्याचे दंडांनी बेदम मारहाण केली. त्यात पुरकर यांना छातीला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे ते बेशुध्द पडले.पथकातील त्यांचे सहकारी तलाठी कुलदीप नरवडे व गजानन भालके यांनी पुरकर यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आल्यामुळे त्यांनी आपला जीव वाचवत तेथून पळ काढला. दरम्यान ट्रॅक्टर व त्यासमवेत असलेल्या संशयित अज्ञात व्यक्ति पसार झाले. गस्ती पथकाच्या वाहनावरील ड्रायव्हरच्या मोबाईलवरून घटनेची माहीती कळविण्यात आली. पुरकर यांना देवळा ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृति अत्यवस्थ झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून तातडीने नासिक येथे जिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले. सदर घटनेचा देवळा तालुका तलाठी व कोतवाल संघटनेने निषेध केला असून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.