शहरात मान्सूनची जोरदार सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 10:29 PM2020-06-12T22:29:41+5:302020-06-13T00:10:38+5:30

नाशिक : शहर व परिसरात शुक्रवारी (दि.१२) दुपारी मान्सून सरींनी जोरदार सलामी दिल्याने लॉकडाऊन व संचारबंदीतून बाहेर पडून सुरुळीत होऊ पाहणारे जनजीवन काहीकाळापुरते का होईना विस्कळीत झाले. हवामान खात्याकडून रविवारपासून जिल्ह्यात मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज वर्तविला जात असताना तत्पूर्वीच दोन दिवस अगोदरच पावसाने शहरात हजेरी लावून झोडपून काढल्याने बळीराजासह नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Strong monsoon opening in the city | शहरात मान्सूनची जोरदार सलामी

शहरात मान्सूनची जोरदार सलामी

Next

नाशिक : शहर व परिसरात शुक्रवारी (दि.१२) दुपारी मान्सून सरींनी जोरदार सलामी दिल्याने लॉकडाऊन व संचारबंदीतून बाहेर पडून सुरुळीत होऊ पाहणारे जनजीवन काहीकाळापुरते का होईना विस्कळीत झाले. हवामान खात्याकडून रविवारपासून जिल्ह्यात मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज वर्तविला जात असताना तत्पूर्वीच दोन दिवस अगोदरच पावसाने शहरात हजेरी लावून झोडपून काढल्याने बळीराजासह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अवघ्या दीड तासात शहरात ५०.८ मिलीमीटर इतका पाऊस पडल्याची नोंद पेठरोडवरील हवामान केंद्राने केली असून, या पावसामुळे महापालिकेने पावसाळापूर्व केलेल्या गटारी व नालेसफाईच्या कामांचे पितळ उघडे पडले आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे यंदा मान्सून ७ जून ऐवजी १५ जूनला बरसणार असा कयास हवामान विभागाने लावला होता; मात्र केरळमधून पुढे महाराष्टÑाच्या दिशेने मान्सूनची वाटचाल वेगाने झाली. शुक्रवारी दुपारी ३ वाजेपासून पावसाच्या दमदार सरी शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये कोसळल्या. वाऱ्याचा वेग अत्यंत कमी राहिल्यामुळे टपोºया थेंबांसह जोरदार सरींचा वर्षाव शहरात सुमारे तासभर झाला. शहरात दुपारी २ वाजेपासून पावसाचे ढग दाटून आले आणि सूर्यप्रकाश पूर्णपणे नाहीसा झाला व अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. साधारणत: तासभर पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर काहीसा वेग मंदावला असला तरी, यामुळे परिसरातील रस्ते जलमय झाले होते. अनलॉकमुळे व्यावसायिकांनी आपापली दुकाने सकाळपासूनच उघडली होती. अचानकपणे आलेल्या पावसामुळे काही प्रमाणात व्यावसायिकांसह रस्त्यांवरील लहान विके्रत्यांचीसुद्धा तारांबळ उडाली. पावसाने आपला माल भिजणार नाहीत, याची खबरदारी भद्रकाली, रविवार कारंजा, मेनरोड, शालिमार, पंचवटी, नाशिकरोड या भागातील विक्रेत्यांकडे पहावयास मिळाली. पहिल्याच पावसात महापालिकेच्या भुयारी गटार व पावसाळी गटारींची दैनावस्था झाली. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले, तर उपनगरांमध्येही घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी नागरिकांनी स्वत:हूनच पाण्याला वाट करून दिली तर काही ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने नाले, गटारींचे झाकणे मोकळे करून द्यावे लागले.
---------------------------
मनपाच्या पावसाळापूर्व कामांचे पितळ उघडे
महापालिका प्रशासनाने पावसाळापूर्व केलेल्या कामांचे पितळ उघडे पडले. अक्षरश: गटारी रस्त्यांवरून ओसंडून वाहू लागल्याने राजेबहाद्दर लेन, सारस्वत नाला, दहीपूल, कानडे मारुती लेन, भद्रकाली, दूधबाजार या भागात गटारी रस्त्यांवर अवतरल्याचे चित्र पहावयास मिळाले. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. गटारींचे काळेकुट्ट सांडपाण्याचे पाट रस्त्यांवरून ओसंडून वाहत असल्याचे बघून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
--------------------
गोदावरीचा जलस्तर वाढला
मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी पात्राच्या पाण्यात वाढ झाली शहरांमधील वाहून येणारे पाणी गोदावरीत मिसळले तसेच पावसाळी भुयारी गटारीदेखील गोदाकाठावर ओसंडून वाहत होत्या यामुळे गोदावरीत दुर्गंधीयुक्त सांडपाणीदेखील मिळाल्याचे गोदावरीप्रेमींनी सांगितले. तासभर शहरात पावसाचा जोर कायम राहिल्याने रामकुंडाजवळ असलेल्या गंगा गोदावरी मंदिर परिसराला पाण्याचा वेढा पडला होता.
-----------------------

नाशिकरोड परिसरात दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाचे आगमन झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसामुळे रस्त्यावरील विक्रेते, पादचारी, दुचाकीचालक यांची तारांबळ उडाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूने पावसाच्या पाण्याचे पाट वाहत होते. नाशिकरोड, जेलरोड, देवळालीगाव, उपनगर आजूबाजूच्या परिसरात शुक्रवारी दुपारी तासभर मुसळधार पावसाचे पाण्याचे तळे साचले होते.

Web Title: Strong monsoon opening in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक