दमदार सरींनी झाेडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:12 AM2021-06-20T04:12:10+5:302021-06-20T04:12:10+5:30
शहरात हवामान खात्याकडून आठवडाभर निरभ्र आकाश राहील असा अंदाज वर्तविला गेला होता. त्यामुळे दहा ते बारा दिवसांपासून पावसाची उघडीप ...
शहरात हवामान खात्याकडून आठवडाभर निरभ्र आकाश राहील असा अंदाज वर्तविला गेला होता. त्यामुळे दहा ते बारा दिवसांपासून पावसाची उघडीप कायम होती. शुक्रवारी पहाटेपासून हलक्या सरींचा अधूनमधून वर्षाव झाला होता. संध्याकाळपर्यंत ५.२ मिमी इतका पाऊस मोजला गेला होता. या तुलनेत शनिवारी मात्र पावसाने दमदार सलामी दिली. शनिवारी पहाटे हलक्या सरींचा वर्षाव काही उपनगरांमध्ये झाला. यानंतर मात्र दिवसभर वातावरणात उकाडा कायम होता. संध्याकाळी पाच वाजता शहरात पावसाने हजेरी लावली. पावणेसहा वाजता पावसाने अवघ्या पंधरा मिनिटांचा ‘ब्रेक’ घेतला आणि काही प्रमाणात दाटून आलेले ढग दूर झाले; मात्र सव्वासहा वाजेपर्यंत शहर व परिसरात पुन्हा ढग भरुन आले आणि दमदार सरींनी सुमारे पंधरा ते वीस मिनिटे झोडपून काढले. संध्याकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत ६.४ मिमी इतका पाऊस मोजला गेला. एकूण रात्री साडेआठ वाजेपर्यंत शहरात २०.७ मिमी इतका पाऊस झाला. वीकेंड लॉकडाऊन सुरु असल्यामुळे शनिवारी बाजारपेठांमध्ये शांतता असल्याने संध्याकाळी आलेल्या पावसाने विक्रेत्यांसह नागरिकांची धावपळ उडाली नाही. पावसाच्या हजेरीने बळीराजाला दिलासा मिळाला आहे. पाथर्डी, अंबड, सिडको, काठेगल्ली, जुने नाशिक, पंचवटी, सीबीएस, कॅनडाकॉर्नर, टिळकवाडी, गंगापूररोड, कॉलेजरोड, आनंदवली, मखमलाबाद, गोदाकाठ आदी परिसरात पावसाने जोरदार सलामी लावली.
--इन्फो--
विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त
वडाळागाव, डीजीपीनगर, अशोकामार्ग, जयदीपनगर या भागात मागील चार दिवसांपासून वीजपुरवठा विस्कळीत झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. सोमवारी (दि.१४) रात्री ११ वाजेपासून मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत वडाळागावाचा वीजपुरवठा खंडित झालेला होता. येथील झीनतनगर, जय मल्हार कॉलनी येथील वीज रोहित्रांमध्ये शॉर्टसर्किट हाेऊन बिघाड झाला होता. बुधवारी दुपारी १२ वाजेपासून पुन्हा वडाळागावाची वीज गायब झाली होती. गुरुवारी सकाळीही विजेचा लपंडाव सुरुच होता. शुक्रवारी अशोकामार्गावर दुपारी दोन ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित झालेला होता. तसेच शनिवारीही पखालरोड, अशोकामार्ग, खोडेनगर, विधातेनगर या भागातील रहिवाशांना विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागला