स्थायीत सेना-भाजपात जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 01:06 AM2017-09-26T01:06:36+5:302017-09-26T01:06:41+5:30

परवान्याबाबत आक्षेप असताना एका ठेकेदाराला घरकुल योजनेच्या विद्युतीकरणाचा ठेका देणे आणि बिटको रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम अर्धवट असताना विद्युतीकरणासाठी विविध प्रकारच्या साहित्य खरेदीला मंजुरी देण्यावरून महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी पक्षाचे सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत सत्ताधारी भाजपासह प्रशासनाला जाब विचारला. दरम्यान, विरोध दर्शवूनही सभापतींनी प्रस्ताव मंजूर करण्याचा पवित्रा घेतल्याने शिवसेनेसह राष्टÑवादीच्या सदस्यांनी सभात्याग केला.

 Stuck in the permanent army-BJP | स्थायीत सेना-भाजपात जुंपली

स्थायीत सेना-भाजपात जुंपली

Next

नाशिक : परवान्याबाबत आक्षेप असताना एका ठेकेदाराला घरकुल योजनेच्या विद्युतीकरणाचा ठेका देणे आणि बिटको रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम अर्धवट असताना विद्युतीकरणासाठी विविध प्रकारच्या साहित्य खरेदीला मंजुरी देण्यावरून महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी पक्षाचे सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत सत्ताधारी भाजपासह प्रशासनाला जाब विचारला. दरम्यान, विरोध दर्शवूनही सभापतींनी प्रस्ताव मंजूर करण्याचा पवित्रा घेतल्याने शिवसेनेसह राष्टÑवादीच्या सदस्यांनी सभात्याग केला.  स्थायी समितीच्या सभेत इतिवृत्त मंजुरीचा विषय आला असता, शिवसेनेच्या सदस्यांनी सभा क्रमांक १६ चे इतिवृत्त मंजुरीसाठी का आले नाही, असा सवाल उपस्थित केला. त्यावर सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी पाणीपुरवठ्याच्या प्रस्तावित दरवाढीचा विषय प्रलंबित असल्याने सभा क्रमांग १६ चे इतिवृत्त मंजुरीसाठी आणले नसल्याचा खुलासा केला. याचवेळी, भाजपाचे सदस्य मुकेश शहाणे यांनी प्रस्ताव क्रमांक २५१ मधील घरकुल योजनेसाठी विद्युतीकरणाच्या ठेक्यासंबंधी इलेक्ट्रिकल असोसिएशनने संबंधित ठेकेदाराविरुद्ध आक्षेप घेतला असतानाही विद्युत विभागाकडून प्रस्ताव आणल्याबद्दल शंका उपस्थित केली. त्यावर, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता वनमाळी यांनी अनुज्ञप्ती मंडळाने सदर ठेकेदाराच्या कागदपत्रांची पडताळणी करून परवाना वैध असल्याचे पत्र दिले असल्याचे स्पष्ट केले. प्रवीण तिदमे यांनी संबंधित मंडळाचे पत्र स्थायीवर का ठेवले नाही, असा जाब विचारला. सदर ठेकेदाराचा ठेकाच रद्द करण्याची मागणी सेना-भाजपाच्या सदस्यांनी घेतली. मात्र, सभापतींनी जोपर्यंत शहानिशा होत नाही तोपर्यंत इतिवृत्त मंजूर न करण्याची भूमिका घेतली आणि ठेकेदाराला द्यायचे कार्यादेश थांबविण्याचे आदेशित केले. बिटको हॉस्पिटलच्या इमारतीसाठी विद्युतीकरणाकरिता सुमारे तीन कोटी रुपयांच्या साहित्य खरेदीचाही विषय चर्चेला आला असता सेनेचे सूर्यकांत लवटे यांनी सदर प्रस्ताव मंजुरीला हरकत घेतली. अद्याप इमारतीचे काम पूर्ण झाले नसताना साहित्य खरेदीची ही घाई कशासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि पाहणी केल्यानंतरच त्याबाबत निर्णय घेण्याची सूचना केली. परंतु, सभापतींनी अत्यावश्यक बाब म्हणून प्रस्ताव मंजूर केल्याने संतप्त झालेले सेनेचे सदस्य सूर्यकांत लवटे, प्रवीण तिदमे, भागवत आरोटे, अपक्ष मुशीर सय्यद तसेच राष्टÑवादीचे राजेंद्र महाले यांनी सभात्याग केला. भाजपाचे सदस्य जगदीश पाटील व मुकेश शहाणे यांनी सभात्याग केलेल्या सेनेच्या सदस्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु सदस्यांनी सभागृहात न येणेच पसंत केले.
मोफत अंत्यविधी ठेक्याला मुदतवाढ
मोफत अंत्यविधी योजनेंतर्गत साहित्य पुरवठ्याच्या ठेक्याला मुदतवाढ देण्यावरूनही शिवसेना सदस्यांनी जाब विचारला. यावेळी, आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी निविदाप्रक्रिया सुरू असून, महिनाभरात नवीन ठेकेदाराला काम दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले. सभापती शिवाजी गांगुर्डे यांनीही जुन्या ठेकेदारांना यापुढे मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे सांगितले.

Web Title:  Stuck in the permanent army-BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.