विद्यार्थी परिषद निवडणुकांची शक्यता धूसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 01:01 AM2019-11-19T01:01:20+5:302019-11-19T01:01:41+5:30

गत पंचवार्षिकमधील सत्ताधारी राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीचे कारण पुढे करत ढकललेल्या महाविद्यालयांतील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांकडे राजकीय मंडळीचे राज्यातील सत्तासंघर्षात दुर्लक्ष झाल्याने चालू शैक्षणिक वर्षात या निवडणुका होण्याची शक्यता धूसर झाली आहे.

 Student Council polls likely blurred | विद्यार्थी परिषद निवडणुकांची शक्यता धूसर

विद्यार्थी परिषद निवडणुकांची शक्यता धूसर

googlenewsNext

नाशिक : गत पंचवार्षिकमधील सत्ताधारी राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीचे कारण पुढे करत ढकललेल्या महाविद्यालयांतीलविद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांकडे राजकीय मंडळीचे राज्यातील सत्तासंघर्षात दुर्लक्ष झाल्याने चालू शैक्षणिक वर्षात या निवडणुका होण्याची शक्यता धूसर झाली आहे. दरम्यान, गत सरकारने घोषणा करूनही निवडणुका होऊ शकल्या नाहीत, त्यामुळे महाविद्यालयीन निवडणुकांच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थी संघटनांना काही दिवसांत सत्तेवर येणाऱ्या नवीन सरकारकडून सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे.
राज्यभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये कार्यरत विद्यार्थी संघटनांनी अनेक वर्षांनी होणाºया महाविद्यालयीन निवडणुकांची जय्यत तयारी केलेली असताना गत सरकारने विधानसभेच्या निवडणुकांचे कारण देत महाविद्यालयीन निवडणुका अचानक पुढे ढकलण्याची घोषणा केली होती. त्यामुळे बहुतांश तयारी पूर्ण झालेली असताना निवडणुका लांबणीवर पडल्याने विद्यार्थी संघटनांच्या उत्साहावर विरजण पडल्याने विद्यार्थी संघटनांनी तत्कालीन सरकारच्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र, राज्यात विधानसभा निवडणुकांनंतर नवीन सरकार स्थापन होताच महाविद्यालयीन निवडणुकांचीही घोषणा होण्याची विद्यार्थी संघटनांना अपेक्षा होती. परंतु, विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात सत्तासंघर्षातून निर्माण झालेली राजकीय परिस्थिती आणि त्यातून लागलेली राष्ट्रपती राजवट यामुळे शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्राला सुरुवात होऊनही महाविद्यालयीन निवडणुकांविषयी कोणतेही सूतोवाच होऊ शकलेले नाही. त्यामुळे यावर्षी राज्यातील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका होण्याची शक्यता धूसर झाली असून, राज्यातील सत्तासंघर्षात विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका मागे पडता की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्षाचे एक सत्र संपले आहे, त्यामुळे निवडणुका झाल्या तरी निवडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींना किती कालावधी मिळेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महिना लागणार
विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन तीन आठवड्यांचा कालावधी उलटल्यानंतरही राज्यात अद्याप सरकार स्थापन झालेले नसल्याने विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. अशा स्थितीत नवीन सरकार स्थापन झाल्यानतंर निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करून प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान एक ते दीड महिन्याचा कालावधी लागू शकतो. तोपर्यंत महाविद्यालयांच्या आवारात राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू होण्याची शक्यता असल्याने यावर्षी तरी महाविद्यालयीन निवडणुका होण्याची शक्यता धूसर झाली आहे.

Web Title:  Student Council polls likely blurred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.