मालेगावी बसच्या धडकेत विद्यार्थी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 11:31 PM2020-03-07T23:31:46+5:302020-03-07T23:32:21+5:30
मालेगाव मध्य : मुंबई-आग्रा महामार्गावरील सायने बु।। शिवारात एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक विद्यार्थी ठार झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
मालेगाव मध्य : मुंबई-आग्रा महामार्गावरील सायने बु।। शिवारात एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक विद्यार्थी ठार झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बसचालक विकास राजेंद्र माळी, रा. शिरपूर याला अटक केली आहे.
शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. धुळेकडून मालेगावकडे येणाऱ्या शिरपूर-पुणे बसने (क्र. एमएच २० बीएल ३४४९) रस्ता ओलांडणाºया दुचाकीला (क्र. एमएच १५ सीएक्स ६७०२) धडक दिली. या अपघातात धीरज रघुनाथ चव्हाण (२५) रा. वसई, हल्ली मुक्काम मालेगाव हा जागीच ठार झाला, तर दुचाकीवर मागे बसलेला शंतनू भिका माळी (२६), रा. सिन्नर हा गंभीर जखमी झाला. धीरज हा औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला होता. महामार्ग पोलिसांनी अग्निशमन यंत्राद्वारे घटनास्थळी धाव घेऊन दुचाकीला लागलेली आग विझवली.
दरम्यान मृताचे नातलग अपघातग्रस्त बसचालकाची माहिती घेण्यासाठी बसस्थानकात गेले असता अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नातलग व मित्र परिवाराने स्थानक आवारात ठिय्या आंदोलन केले. यामुळे आवारात वाहतूक ठप्प झाली होती. या आंदोलनाची माहिती आयेशानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खगेंद्र ठेंबेकर, सहायक पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांना मिळताच त्यांनी कर्मचाºयांसह आंदोलनस्थळी धाव घेतली. आंदोलक व
बसस्थानक प्रशासनांमध्ये मध्यस्थी केल्याने आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. अपघातातील मृत धीरजचे वडील रघुनाथ चव्हाण राज्य परिवहन विभागात वाहक पदावर कार्यरत आहेत. घटना घडली तेव्हा रघुनाथ हे शहादा-वसई बस मालेगावकडे येत होते. येताना त्यांनी अपघात पाहिला. बसस्थानकात गाडी पोहोचताच त्यांच्या भ्रमणध्वनीवर मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. यावेळी त्यांनी एकच हंबरडा फोडला. काळीज पिळवटून टाकणारी बातमी कर्तव्य बजावत असतानाच मिळाल्याने बसस्थानकातील वाहक व चालकांना गहिवरुन आले होते.