शिक्षकांअभावी विद्यार्थी वाऱ्यावर
By admin | Published: August 14, 2014 11:20 PM2014-08-14T23:20:55+5:302014-08-15T00:28:09+5:30
शिक्षकांअभावी विद्यार्थी वाऱ्यावर
करंजगाव : निफाड तालुक्यातील करंजगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वर्षभरापासून तीन शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकांच्या रिक्त जागा तत्काळ न भरल्यास मंगळवार, दि. १९ आॅगस्टपासून शाळेला व गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
करंजगाव शाळेत २१५ विद्यार्थी असून, सध्या चारच शिक्षक उपलब्ध आहे. बुधवारी शिवसेना तालुकाप्रमुख उत्तम पाटील गडाख यांच्या नेतृत्वाखालील करंजगावच्या शिष्टमंडळाने पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी इंदिरा आवास, शिक्षणाधिकारी तुंगार यांच्याशी करंजगावसह तालुक्यातील इतर गावातील शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षक उपलब्धतेबाबत चर्चा
केली. तालुक्यातील अनेक शाळांमध्ये सुमारे १०५ उपशिक्षक व इतर ३० ते ३५ पदवीधर शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तालुक्यात १४० शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांची हेळसांड सुरू असल्याने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुकाप्रमुख उत्तम गडाख यांनी यावेळी गटविकास अधिकाऱ्यांना दिला. याबाबत तातडीने वरिष्ठ स्थरावर पाठपुरावा करून शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन बीडीओ अस्वार यांनी दिले. करंजगाव ग्रामस्थ व निफाड तालुका शिवसेनेच्या वतीने यावेळी अस्वार यांना निवेदन दिले. यावेळी खंडू बोडके, सागर जाधव, नंदू राजोळे, नंदू निरभवणे, आनंद बिवाल, खंडू बोडके-पाटील, अर्जुन खोकराळे, विजय जाधव, संदीप ढेपले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. (वार्ताहर)