बससाठी विद्यार्थ्यांचा पुन्हा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:24 AM2017-09-03T00:24:01+5:302017-09-03T00:24:32+5:30
बसच्या वाढत्या तक्रारींमुळे चांदोरी आणि परिसरातील विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांनी बस डेपोत येत नाही तसेच महामार्गावरदेखील बस थांबत नसल्याने पुन्हा एकदा परिवहन महामंडळाच्या विरोधात एल्गार पुकारल्याने नाशिक-औरंगाबाद महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती.
सायखेडा : बसच्या वाढत्या तक्रारींमुळे चांदोरी आणि परिसरातील विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांनी बस डेपोत येत नाही तसेच महामार्गावरदेखील बस थांबत नसल्याने पुन्हा एकदा परिवहन महामंडळाच्या विरोधात एल्गार पुकारल्याने नाशिक-औरंगाबाद महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. बसचालक व वाहक यांच्या मनमानीमुळे आठवड्याभरात तिसºयांदा नागरिकांना परिवहन महामंडळाच्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागल्याने संताप व्यक्त केला जात आहे. बसविरोधात वारंवार आंदोलने करावी लागत असल्याने चांदोरी आंदोलनाचे केंद्रबिदू ठरू पाहत आहे.
येथील स्थानकात लासलगाव डेपोच्या बसेस येत नसल्यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. अनेकदा तक्ररी करूनही बस येत नसल्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी अचानक विद्यार्थी व प्रवाशांनी नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील चांदोरी चौफुलीवर रास्ता रोको करत रोष व्यक्त केला. पंधरा ते वीस मिनिटांच्या आंदोलनानंतर बसेस स्थानकात आणण्यात आल्या. बस येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान पाहून ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब खरात, समाजसेवक पांडुरंग पगारे, सोमनाथ कोटमे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. लासलगाव डेपोच्या सर्व बसेस स्थानकात नियमित याव्या, अशी मागणी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे.