स्थानिक भाषा येण्यात विद्यार्थ्यांचे हितच अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:40 AM2019-07-24T00:40:18+5:302019-07-24T00:42:25+5:30
प्रत्येक शाळेत मराठी भाषा शिकवणे बंधनकारक करण्याच्या शासनाच्या प्रस्तावित निर्णयाबाबत बहुतांश शालेय प्रमुखांनी सकारात्मकता दाखविली आहे. विद्यार्थी अन्य भाषिक असला तरी त्याला स्थानिक मराठी भाषा येणे, हे बंधनकारक न मानता त्यातील उपयुक्तता समजून घ्यावी.
माझे मत
नाशिक : प्रत्येक शाळेत मराठी भाषा शिकवणे बंधनकारक करण्याच्या शासनाच्या प्रस्तावित निर्णयाबाबत बहुतांश शालेय प्रमुखांनी सकारात्मकता दाखविली आहे. विद्यार्थी अन्य भाषिक असला तरी त्याला स्थानिक मराठी भाषा येणे, हे बंधनकारक न मानता त्यातील उपयुक्तता समजून घ्यावी. कारण त्यात विद्यार्थ्यांचे अधिक प्रमाणात हित असल्याचा सूर नाशिक महानगरातील विविध शाळांच्या प्रमुखांनी व्यक्त केला.
शाळांमध्ये मराठीची सक्ती हा प्रस्तावित निर्णय अत्यंत आवश्यक होता. अन्य अनेक राज्यांमध्ये तेथील भाषा शिकणे बंधनकारक असल्याने महाराष्ट्रातदेखील तो निर्णय होणे अपेक्षितच होते. शासनाने योग्य दिशेने टाकलेले हे पाऊल आहे. मात्र, महाराष्टÑातील मराठी माणसांनी व्यवहारातदेखील मराठी भाषेचा वापर केला तरच मराठी टिकू शकेल. त्यामुळे मराठी भाषेचा व्यावहारिक उपयोग अधिकाधिक कसा करता येईल, त्याचादेखील गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.
- प्रा. दिलीप फडके, शिक्षणतज्ज्ञ
प्रत्येक शाळेमध्ये मराठी भाषा
बंधनकारक करायलाच हवी, असे माझेदेखील मत आहे. आपण अन्य देशांच्या भाषा शिकू शकतो, तर जिथे राहतो तेथील भाषा शिकण्यास कोणतीच अडचण नसावी. स्थानिक भाषा शिकणे हा त्या भाषेचा सन्मान असतो, तसेच मुलांची त्या भाषेशी आणि स्थानिकांशी भावनिक जवळीकदेखील वाढण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक शाळेत मराठी भाषेचा आवर्जून समावेश करायला हवा, असे मला वाटते.
- रतन लथ, संचालक, फ्रावशी अकॅडमी
प्रत्येक राज्यात तेथील भाषासक्ती ही करायलाच हवी, असे माझे मत आहे. एसएससी बोर्डप्रमाणेच सीबीएसई, आयसीएसईलादेखील मराठी बंधनकारक करण्याच्या निर्णयाचे स्वागतच व्हायला हवे. महाराष्टÑात राहताना मराठी येण्याने त्या मुलांचाच फायदा होणार असतो. त्यामुळे इतर भाषिक असले तरी ते समाजात सहजतेने मिसळू शकतात.
- विजयालक्ष्मी मणेरीकर, संचालक,
ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूल
कोणत्याही भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांसाठी स्थानिक भाषांचे महत्त्व खूप असते. त्यामुळे त्याची सक्ती वाटून न घेता, ती संधी मानत शिकायला हवी. जी मुले अधिकाधिक भाषा शिकतात, त्यांचे ज्ञान अधिकाधिक समृद्ध होत जाते. त्यासाठी गत शतकात विदेशात गेलेल्या भारतीयांची उदाहरणेदेखील नजरेसमोर ठेवता येतील. तसेच बालवयात मुलांना भाषेचे आकलन अधिक झटकन होत असल्याने बालपणापासून माध्यमिक शाळेपर्यंत मराठी भाषा बंधनकारक केली तरी त्याचे स्वागतच होईल.
- स्वामिनी वाघ, मुख्याध्यापक, बॉइज टाउन स्कूल