निकालाची ‘चॉइस’ विद्यार्थ्याची
By admin | Published: May 31, 2016 11:53 PM2016-05-31T23:53:28+5:302016-06-01T00:11:20+5:30
श्रेणी सुधारण्याची संधी : शाखा बदलण्यासाठीही परीक्षा देणे शक्य
नाशिक : नुकत्याच जाहीर झालेल्या बारावी परीक्षेच्या निकालानंतर अनेक विद्यार्थ्यांनी कमी गुण मिळाल्याबद्दल बोर्डाला विचारणा केली, तर असंख्य विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रतींचीदेखील मागणी केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले, परंतु त्यांना चांगले गुण मिळविण्याची अपेक्षा होती त्यांना श्रेणी सुधार योजनेंतर्गत आपल्या निकालाची श्रेणी सुधारण्याची संधी उपलब्ध असल्याची माहिती विभागीय सचिव मारवाडी यांनी दिली.
विद्यार्थ्यांना आपल्या गुणांकामध्ये सुधारणा करण्याची संधी बोर्डाने श्रेणी सुधार योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे, परंतु याविषयीची स्पष्ट कल्पना विद्यार्थ्यांना नसते, शिवाय अनेक शंकाही असतात. त्यामुळे विद्यार्थी या श्रेणी सुधार योजनेपासूनही वंचित राहतात. संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना पुरेशी माहिती देणेही अपेक्षित असते. परंतु शाळेतून माहिती दिली जात नसल्याने विद्यार्थी संभ्रमावस्थेत असतात.
निकाल जाहीर झाल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याला वाटले की आपल्याला कमी गुण मिळालेले आहेत, आपण यापेक्षाही चांगले गुण मिळवू शकलो असतो तर अशा विद्यार्थ्याला त्याच्या गुणांची श्रेणी सुधारण्याची संधी मिळू शकते. परंतु त्यासाठी संबंधित विद्यार्थी हा संपूर्ण विषय उत्तीर्ण असणे अपेक्षित आहे. त्याला संपूर्ण विषय घेऊनच पुनर्परीक्षा देता येते. समजा त्यास ७५ टक्के गुण मिळाले असतील आणि त्याला ८० ते ९० टक्के गुण मिळणे अपेक्षित होते, तर तो विद्यार्थी संपूर्ण विषयांची पुनर्परीक्षा देऊन आपल्या गुणात सुधारणा करवू शकतो. दुर्दैवाने तो दुसऱ्या म्हणजे पुरवणी परीक्षेत अनुत्तीर्ण झाला तर त्याचा पहिला निकाल ग्राह्य धरला जातो.
त्यामुळे अनुत्तीर्ण निकालाचे महत्त्व उरत नाही. परंतु तो जर पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि त्याला पहिल्या निकालापेक्षा जास्त किंवा कमी गुण मिळाले तर त्या विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी कोणते गुणपत्रक वापरायचे याचा ‘चॉइस’ असतो. शक्यतो उत्तीर्ण झालेला विद्यार्थी श्रेणी सुधारण्याची संधी घेत नाहीत. दुसरी बाब म्हणजे पुन्हा अभ्यास करून परीक्षेला बसण्याची त्याची मानसिक तयारी नसते. परंतु जर याउपरही एखाद्या विद्यार्थ्याने श्रेणी सुधारण्यासाठी परीक्षा दिली तर ज्या गुणपत्रिकेत त्याला जास्त गुण आहेत अर्थात तीच गुणपत्रिका तो पुढे वापरू शकतो. यंदा राज्यात बारावीचा नाशिक विभागाचा निकाल सर्वांत कमी लागल्याने निकालाची चिकित्सा करावी, अशी मागणी अनेक पालकांनी केली होती, तर असंख्य विद्यार्थ्यांना अपेक्षे पेक्षा कमी गुण मिळाल्याने त्यांच्यात नाराजी पसरली आहे. अशा विद्यार्थ्यांनी आता उत्तरपत्रिकांची झेरॉक्सप्रत मिळावी यासाठी विभागीय मंडळाकडे अर्ज केले आहेत. विद्यार्थी आपली उत्तरपत्रिका आपल्या विषय शिक्षकाकडून तपासून घेऊ शकतो. बोर्डाच्या मॉडेल उत्तरपत्रिकेनुसार संबंधित शिक्षकाने विद्यार्थ्याला उत्तरपत्रिका तपासून देण्याची अपेक्षा आहे. यामुळे विद्यार्थ्याला मिळालेले गुण आणि त्याचे लिहिलेले उत्तर याची स्पष्ट कल्पना येऊ शकते. यासाठी विद्यार्थ्याला उत्तरपत्रिकेची झेरॉक्स दिली जाते. (प्रतिनिधी)