पत्रपेटी ते एटीएमपर्यंतचा प्रवास जाणून घेताना ‘वाणिज्य’चे विद्यार्थी थक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 04:29 PM2018-12-15T16:29:54+5:302018-12-15T16:31:37+5:30
विद्यार्थ्यांच्या चमूने नुकतीच शहरातील मुख्य टपाल कार्यालयाला भेट देत ‘पोस्ट बॅँकिंग’सह विविध योजना जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
नाशिक : वाणिज्य शाखेतून पदवी घेणाऱ्या बीवायके महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या चमूने नुकतीच शहरातील मुख्य टपाल कार्यालयाला भेट देत ‘पोस्ट बॅँकिंग’सह विविध योजना जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
वाणिज्य शाखा म्हटली की बॅँकिंग क्षेत्र आलेच. दिवसेंदिवस बॅँकिंगमध्ये घडून येणारे अमुलाग्र बदल आणि त्याच दृष्टीकोनातून टपाल खात्यानेदेखील टाकलेली कात लक्षात घेता बीवायकेच्या सुमारे दहा ते बारा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परवानगीने टपाल कार्यालयाला भेट दिली. यावेळी वरिष्ठ पोस्त मास्तर मोहन अहिरराव यांनी विद्यार्थ्यांना टपाल विभागाच्या बॅँकिंगप्रणालीसह आर्थिक व्यवहाराबाबतच्या टपालाच्या विविध योजनांची माहिती दिली. सुकन्या समृध्दी योजना, इंडियन पोस्ट पेमेंट बॅँक, भविष्यनिवार्हनिधी खाते योजना, बचत किसान पत्र, पोस्टल विमा, मुदत ठेव या आर्थिक देवाणघेवाणीशी संबंधित चालणा-या कार्याचाी सविस्तर माहिती दिली. तसेच आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात टपाल खात्याचा कामाचा ताण निम्म्यापेक्षा अधिक कमी झाल्याचा गैरसमजही दूर करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.
टपाल बटवडा विभाग, स्पीड पोस्ट विभाग, फ्रॅन्कींग विभागाला भेटी देत विद्यार्थ्यांनी येथील प्रत्यक्ष कार्यानुभव याचि देही याचि डोळा बघितले. तसेच पोस्ट खाते काळानुरूप आधुनिक झाले असल्याचा प्रत्ययदेखील विद्यार्थ्यांना आला. येथील पत्रपेटी, टपाल डिलिव्हरी व्हॅन आणि एटीएम बघून विद्यार्थी अवाक् झाले. पत्रपेटीपासून सुरू झालेला टपाल खात्याचा प्रवास थेट एटीएमपर्यंत येऊन पोहचल्याचे बघून विद्यार्थ्यांनाही आनंद झाला. सर्वात सुरक्षित असे सरकारी नियंत्रण असलेले जुने खाते म्हणून पोस्टाची ओळख विद्यार्थ्यांना पटली. अहिरराव यांनी पोस्टाचे विविध अॅन्ड्रॉइड अॅपसंदर्भातही विद्यार्थ्यांना माहिती दिली. बीवायके महाविद्यालयाकडून हा अभ्यास दौरा पदवीच्या अखेरच्या वर्गात शिकणा-या विद्यार्थ्यांकरिता प्रत्यक्ष अभ्यास अहवाल तयार करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता.