विद्यार्थ्यांची कुचंबणा : दोन वर्षांपासून वंचित

By admin | Published: August 19, 2014 12:47 AM2014-08-19T00:47:51+5:302014-08-19T01:21:06+5:30

शिष्यवृत्ती मिळवण्याचा मार्ग अखेर मोकळा

Student's dilemma: For two years, deprived | विद्यार्थ्यांची कुचंबणा : दोन वर्षांपासून वंचित

विद्यार्थ्यांची कुचंबणा : दोन वर्षांपासून वंचित

Next

नाशिक : इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची बॅँक खाती न उघडल्याने २३४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागले होते. तब्बल दोन वर्षांपासून मुलांना शिष्यवृत्ती मिळत नव्हती. शिक्षण मंडळाने सर्वच शाळांना तंबी दिल्याने आता या विद्यार्थ्यांना त्यांची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरवर्षी शासनाच्या वतीने चौथी आणि सातवी इयत्तेतील मुलांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात. त्यात उत्तीर्ण मुलांना शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. चौथीच्या मुलांना शंभर रुपये प्रती दिन, तर सातवीच्या विद्यार्थ्यांना दीडशे रुपये प्रती महिना दिले जातात. त्यासाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीयीकृत बॅँकेत खाते उघडावे लागते. त्याची माहिती आॅनलाइन भरल्यानंतर ही शिष्यवृत्तीची रक्कम भरली जाते. २०१२-१३ या आर्थिक वर्षात चौथीच्या परीक्षेत १०४ विद्यार्थी, तर सातवीत एकूण १२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात चौथीच्या परीक्षेत महापालिकेच्या शाळांमधील चार, तर सातवीच्या परीक्षेत ५६ विद्यार्थी आहेत. या सर्वांना शिष्यवृत्ती देण्यासाठी त्यांची बॅँक खाती उघडणे आवश्यक होते. परंतु शिक्षण मंडळाने दुर्लक्ष केले आणि संबंधित शाळांनी उदासीनता दाखवली. त्यामुळे अद्याप ही माहितीच संकलित होऊ शकली नव्हती.
शिक्षण मंडळात पूर्णवेळ प्रशासनाधिकारी म्हणून किरण कुंवर यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर संबंधित शाळांना पत्र पाठवून कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे आता केवळ १३ विद्यार्थ्यांचीच खाती उघडण्यात आलेली नाहीत. बाकी सर्व विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्यांची माहिती कळविण्यात आली आहे. त्यांना शिष्यवृत्ती मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ज्या आठ शाळांनी वारंवार सूचना देऊनही विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्यांची माहिती दिली नाही त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रस्ताव शिक्षण उपसंचालकांना पाठविण्यात आला आहे. या आठ शाळांमध्ये सेंट फिलोमीना इंग्लिश मीडियम स्कूल, जेलरोड, सिल्व्हर ओक, शरणपूर, बाबूभाई कापडिया इंग्लिश मीडियम स्कूल, पंचवटी, प्राथमिक विद्यालय, सिडको, माध्यमिक विद्यालय सिडको, पेठे हायस्कूल, रविवार कारंजा, मॉडर्न एज्युकेशन आणि महापालिकेच्या बी. डी. भालेकर हायस्कूल यांचा यात समावेश असल्याचे मंडळाच्या प्रशासनाधिकारी किरण कुंवर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Student's dilemma: For two years, deprived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.