शाळेची पायरी चढण्यासाठी विद्यार्थी उत्सुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:15 AM2021-09-27T04:15:27+5:302021-09-27T04:15:27+5:30
गेल्या दीड ते दोन वर्षांपासून शाळा महाविद्यालये बंद असल्याने, पर्यायी उपाय म्हणून विद्यार्थी मोबाईल आणि संगणकाद्वारे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण ...
गेल्या दीड ते दोन वर्षांपासून शाळा महाविद्यालये बंद असल्याने, पर्यायी उपाय म्हणून विद्यार्थी मोबाईल आणि संगणकाद्वारे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत होते. त्यात त्यांच्या शैक्षणिक समस्यांचे निराकरण करण्यात त्यांना अनेक तांत्रिक अडचणीदेखील येत होत्या. शाळा, वर्ग, शिक्षक, मित्र-मैत्रीणी, क्रीडांगण, मैदानी खेळ यांच्यापासून दीर्घकाळ दूर राहण्याचे दुःख त्यांना नेहमी सतावत होते. शाळेच्या माध्यमातून प्रत्यक्षात सर्वांच्या भेटीचा योग येणार असल्याने विद्यार्थ्यामध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. शाळा सुरु होणार असल्याने प्रत्यक्ष शिक्षणाच्या अनुभूतीसह आपल्या सख्या सवंगड्यांना भेटण्याचा आनंदाने विद्यार्थी भारावून गेले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या शाळा सुरू करण्याच्या परिपत्रकानुसार राज्यभरातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालये ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेसंबंधी तयारी करण्यात येत आहे. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे, शाळेत विद्यार्थी दाखल होताना प्रवेश द्वाराजवळच तापमापीद्वारे ताप व ऑक्सिजनची पातळी यांची तपासणी करणे, सॅनिटायझयरची फवारणी करुन निर्जंतुकीकरण करणे, मास्कची सक्ती, वर्गातील बैठक व्यवस्थेत बदल करुन दोन विद्यार्थ्यांमधील सुरक्षित अंतर, अशी खास बैठक व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. शाळा भरताना व सुट्टीच्यावेळी विद्यार्थ्यांची होणारी गर्दी टाळण्यासाठी नियोजन, क्रीडांगणावर गर्दी टाळण्यासाठी उपाय यासाठी शिक्षण विभागासह शाळा व्यवस्थापन विशेष खबरदारी घेणार आहे.
कोट.....
दीर्घ काळाच्या प्रतीक्षेनंतर शाळेची घंटा वाजणार असली तरी कोरोनाच्या सर्व बाबीतून ही धोक्याची घंटा ठरू नये; यासाठी शाळा व्यवस्थापनासह साऱ्यांनीच विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. नाहीतर शासनाचा हा निर्णय अंगलट येण्याची भीती नाकारता येत नाही. कोरोनाच्या अनुषंगाने काळजी घेतली आणि शिक्षक, पालकांसह विद्यार्थ्यांनी देखील याबाबत जागरुकता ठेवली, तरच शाळांमधील ही चिवचिवट अशीच निरंतर सुरू राहील यात दुमत नाही.
- डॉ. हरिष पाटील, वैद्यकीय तज्ज्ञ
कोट....
वडिलांच्या मोबाईलवर शाळेचा अभ्यास येत असल्याने रात्रीच्या वेळी दिलेला अभ्यास पूर्ण करावा लागत होता. शिवाय शिक्षकांची प्रत्यक्षात भेट होत नसल्याने अभ्यासातील काही संकल्पना समजून घ्यायला मोठ्या अडचणी येत होत्या. मित्रांची मदत घेता येत नसे. आता मात्र पुन्हा नव्याने हे सारे सुरु होणार आसल्याने, व जीवलग मित्रांसमवेत मनसोक्तपणे खेळता येणार याचा मोठा आनंद झाला आहे.
- अतुल दुकळे, विद्यार्थी, जळगाव निंबायती