‘पात्रता’ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना चिंता
By admin | Published: October 26, 2015 11:18 PM2015-10-26T23:18:06+5:302015-10-26T23:18:52+5:30
शासन उदासीन : सुमारे १७ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात
नाशिक : राज्य शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेत आतापर्यंत सुमारे १७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. मात्र या विद्यार्थ्यांना अद्यापही नोकरीची संधी मिळाली नसल्याने त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. विशेष म्हणजे पात्र उमेदवारांना डावलून जे पात्र नाहीत अशा उमेदवारांना मात्र नोकरीची संधी दिली जात असल्याचा आरोपही होत आहे.
मागील दोन वर्षांपासून डीएड उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टीईटी पात्र परीक्षा घेतली जाते. अत्यंत काठीण्य पातळी असलेल्या या परीक्षेचा निकाल अत्यंत कमी लागतो. डीटीएड व बीएड उमेदवारांसाठी दरवर्षी सदर परीक्षा डिसेंबर महिन्यात घेतली जाते. पेपर-१ व पेपर-२ मिळून ८०० रुपये परीक्षा शुल्कही आकारले जाते. सुमारे चार लाख विद्यार्थ्यांनी आतापर्यंत सदर परीक्षा दिली असून, केवळ १७ हजार विद्यार्थी या परीक्षेतून उत्तीर्ण झालेले आहेत. मागील दोन वर्षांचा निकाल ५ टक्के पेक्षाही कमी लागलेला असून मागील दोन वर्षांत उत्तीर्ण उमेदवारांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मागील दोन वर्षांतील विद्यार्थ्यांना अद्याप नोकरीची संधी दिली नसताना शासन आता पुन्हा डिसेंबरमध्ये टीईटी परीक्षा घेण्याच्या तयारीत आहे. सिडकोतील विशाल पाटील या विद्यार्थ्याने टीईटी पात्रताधारकांसाठी संघटन करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ६६६.ेंँं३ी३ेङ्म५ेील्ल३@ ॅें्र’.ूङ्मे असे संकेतस्थळही तयार करण्यात आले आहे. टीईटी उत्तीर्ण होऊनही जे विद्यार्थी अद्याप नोकरीपासून वंचित आहेत, असे विद्यार्थी आता एकत्रित लढा उभारणार आहेत. (प्रतिनिधी)