विद्यार्थ्यांनी गावात भरविला आठवडे बाजार
By admin | Published: January 29, 2017 11:47 PM2017-01-29T23:47:42+5:302017-01-29T23:47:57+5:30
निमगुले : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भरला बाल आनंद मेळावा
गिसाका : मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या निमगुले मोठे शाळेत बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला. मुलांना छोट्या-मोठ्या उद्योगाच्या गोडीबरोबर गणित विषयाची प्रत्यक्ष माहिती मिळावी तसेच भविष्यात कोणत्याही लहान-मोठ्या व्यवसायाबद्दल आपुलकी निर्माण व्हावी या हेतूने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी दुकानांमध्ये भाजीपाल्यासह इतर वस्तूंची दुकाने विद्यार्थ्यांनी मांडली होती. यामुळे मुलांना स्वत: पैशाचे व्यवहार करता आले. चिमुकल्या हाताने विकलेल्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मेळाव्यास आठवडा बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले होते. मेळाव्याच्या नियोजनासाठी मुख्याध्यापक प्रकाश जगताप, मंगला मोरे, मधुकर सूर्यवंशी, बळवंत पवार, दीपक निकम, आप्पा मोरे, अनुराधा वैद्य यांनी प्रयत्न केले. मेळाव्यास शिक्षण विस्तार अधिकारी तुकाराम पवार, भाऊसाहेब कापडणीस यांसह पालक व ग्रामस्थांनी भेट दिली. ग्रामस्थांनी बाजारात खरेदी करून बालकांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. (वार्ताहर)