जखमी श्वानाला विद्यार्थ्यांनी दिले जीवदान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 11:35 PM2019-12-29T23:35:45+5:302019-12-29T23:36:13+5:30
पिसाळलेल्या बैलाला जेसीबीच्या साहाय्याने निर्दयपणे जीवे मारणाऱ्या माथेफिरूंचे वृत्त काही दिवसांपूर्वी दूरदर्शनवर आले होते. मुक्या प्राण्यांचा अमानुषपणे छळ करून त्यांचे हाल करणारी माणसे जशी आपल्याला पाहायला मिळतात तशीच या प्राण्यांची काळजी घेऊन त्यांच्यावर कोसळलेल्या संकटातून त्यांची सुटका करणारी माणसेही या जगात आहेत. याच गोष्टीचा प्रत्यय देणारी घटना तालुक्यातील जळगाव निंबायती येथील गो. य. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात अनुभवायला मिळाली.
जळगाव निंबायती : पिसाळलेल्या बैलाला जेसीबीच्या साहाय्याने निर्दयपणे जीवे मारणाऱ्या माथेफिरूंचे वृत्त काही दिवसांपूर्वी दूरदर्शनवर आले होते. मुक्या प्राण्यांचा अमानुषपणे छळ करून त्यांचे हाल करणारी माणसे जशी आपल्याला पाहायला मिळतात तशीच या प्राण्यांची काळजी घेऊन त्यांच्यावर कोसळलेल्या संकटातून त्यांची सुटका करणारी माणसेही या जगात आहेत. याच गोष्टीचा प्रत्यय देणारी घटना तालुक्यातील जळगाव निंबायती येथील गो. य. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात अनुभवायला मिळाली.
भटक्या श्वानांच्या भांडणात जखमी अवस्थेतील एका श्वानाने गो. य. पाटील विद्यालयाच्या एक वर्गखोलीत आश्रय घेतला. थंडीपासून व इतर श्वानांपासून बचावासाठी नकळतपणे येऊन लपलेले हे श्वान कोणाच्याही निदर्शनास आले नाही. शाळा सुटली तसे विद्यार्थी व शिक्षक वर्गखोल्या बंद करून घरी गेले. बाहेर निघण्याचा प्रयत्नात श्वानाची खिडकीच्या लोखंडी चौकटीत मान पूर्ती अडकली, त्याने खूप झटापट करून निघण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र त्याचे हे प्रयत्न अपयशी ठरले. तद्नंतर त्याने जोरजोरात भुंकण्यास सुरु वात केली.
मात्र रात्रीच्या वेळी घडलेला प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही. सकाळच्या सुमारास कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी वर्गखोलीत आले असता सदर प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. बघ्यांची मोठी
गर्दी झाली होती. अशावेळी सौरभ शिंदे व त्याचा मित्र सतीश कोरे, आशिष ढोणे, शुभम पवार, विशाल कांबळे व संदीप घुगे यांनी सुटकेसाठी जिवाचा आटापिटा करून विव्हळत असलेल्या श्वानाला लोखंडी चौकटीतून बाहेर काढण्याचा
प्रयत्न केला, मात्र श्वानाचे डोके चौकटीतील मधल्या भागात अडकल्यामुळे त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत होते. शिवाय रात्रभर सुटकेचा प्रयत्न करणारा श्वान चावा घेण्याची शक्यता होती.
यावेळी प्राध्यापक अमोल आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातून हॅक्सॉ ब्लेड आणण्यात आले व अतिशय सावधगिरीने श्वानाला कुठलीही इजा न होऊ देता, तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षितता विचारात घेता त्या खिडकीची लोखंडी चौकट हळूहळू कापण्यात आली. जवळपास दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर त्या जखमी अवस्थेतल्या श्वानाची सुखरूप सुटका झाली. श्वानाने एकच पळ काढल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.
पाटील विद्यालयाच्या एक वर्गखोलीत खिडकीच्या जाळीतील लोखंडी चौकटीत श्वानाची मान अडकली होती. विद्यार्थ्यांनी सावधगिरीने श्वानाला कुठलीही इजा न होऊ देता, खिडकीची लोखंडी चौकट हळूहळू कापली व कुत्र्याची सुखरुप सुटका झाली. विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या या धाडसाचे संस्था अध्यक्ष कासूताई पाटील, सचिव महेंद्र पाटील, निंबाजी शिंदे, प्राचार्य जी. एस. फसाले, प्रा. पी. जी. माने, एस. टी. जाधव, पी. यू. शिंदे, सी. डी. राजपूत, डी. एस. जमधाडे व
प्रा. अमोल अहिरे यांनी कौतुक केले.