विद्यार्थ्यांना शाळेतूनच मिळणार पाठ्यपुस्तके मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप : सर्व शिक्षा अभियानांतर्गत पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकाचे होणार वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 01:03 AM2017-12-30T01:03:47+5:302017-12-30T01:04:43+5:30
नाशिक : विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके हातात न देता पाठ्यपुस्तकांची रक्कम त्यांच्या बॅँक खात्यात जमा करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाने मागे घेण्यात आला.
नाशिक : विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके हातात न देता पाठ्यपुस्तकांची रक्कम त्यांच्या बॅँक खात्यात जमा करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाने मागे घेण्यात आला असून, आता विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच शाळेतून पाठ्यपुस्तके मिळणार आहेत.
शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पाठ्यपुस्तके शाळेतून न देता तेवढी रक्कम विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्यात जमा करण्याचे आणि विद्यार्थ्यांनी त्या पैशातून पुस्तके विकत घेण्याचे आदेश काढले होते. या आदेशासंदर्भात शिक्षण विभाग तसेच मुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रारी करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्यात पैसे दिल्यास शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी पुस्तके विकत घेऊन शाळेत येतील याची शाश्वती नसल्याने आणि त्यातून विद्यार्थ्यांपर्यंत पाठ्यपुस्तके मिळतीलच याची शाश्वती नसल्याने अखेर मुख्यमंत्र्यांनी या निर्णयात हस्तक्षेप करीत पुढीलवर्षी विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच मोफत पाठ्यपुस्तके शाळेतूनच मिळतील असे आदेश काढले आहेत. सदर आदेश जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शिक्षण विभागालादेखील प्राप्त झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे पालकांची परवड थांबणार आहे. बॅँक खाते उघडण्यासाठी पालकांची चांगलीच धावपळ झाली होती. शिवाय पाठ्यपुस्तके खरेदीमुळे सर्वच विद्यार्ती पाठ्यपुस्तके खरेदी करतीलच याची शाश्वती नव्हती. शिवाय पहिल्याच दिवशी शाळेतून मिळणाºया पुस्तकांचा आनंद वेगळाच असल्याने विद्यार्थ्यांना आता हा आनंद मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत.
- नंदलाल धांडे, अध्यक्ष, खासगी शिक्षक-शिक्षकेतर महासंघ