विद्यार्थ्यांनी जाणून घेतली ‘पोस्ट बॅँकिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:42 AM2018-12-17T00:42:46+5:302018-12-17T00:43:06+5:30

वाणिज्य शाखेतून पदवी घेणाऱ्या बीवायके महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या चमूने नुकतीच शहरातील मुख्य टपाल कार्यालयाला भेट देत ‘पोस्ट बॅँकिंग’सह विविध योजना जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

Students Learned 'Post Banking' | विद्यार्थ्यांनी जाणून घेतली ‘पोस्ट बॅँकिंग’

विद्यार्थ्यांनी जाणून घेतली ‘पोस्ट बॅँकिंग’

Next
ठळक मुद्देअभ्यास दौरा : पत्रपेटी ते एटीएमपर्यंतचा प्रवास बघून थक्क

नाशिक : वाणिज्य शाखेतून पदवी घेणाऱ्या बीवायके महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या चमूने नुकतीच शहरातील मुख्य टपाल कार्यालयाला भेट देत ‘पोस्ट बॅँकिंग’सह विविध योजना जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
वाणिज्य शाखा म्हटली की बॅँकिंग क्षेत्र आलेच. दिवसेंदिवस बॅँकिंगमध्ये घडून येणारे आमूलाग्र बदल आणि त्याच दृष्टिकोनातून टपाल खात्यानेदेखील टाकलेली कात लक्षात घेता बीवायकेच्या सुमारे दहा ते बारा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परवानगीने टपाल कार्यालयाला भेट दिली. यावेळी वरिष्ठ पोस्ट मास्तर मोहन अहिरराव यांनी विद्यार्थ्यांना टपाल विभागाच्या बॅँकिंगप्रणालीसह आर्थिक व्यवहाराबाबतच्या टपालाच्या विविध योजनांची माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजना, इंडियन पोस्ट पेमेंट बॅँक, भविष्यनिवार्हनिधी खाते योजना, बचत किसान पत्र, पोस्टल विमा, मुदत ठेव या आर्थिक देवाणघेवाणीशी संबंधित चालणाºया कार्याचाी सविस्तर माहिती दिली. तसेच आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात टपाल खात्याचा कामाचा ताण निम्म्यापेक्षा अधिक कमी झाल्याचा गैरसमजही दूर करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.
पत्रपेटीपासून सुरू झालेला टपाल खात्याचा प्रवास थेट एटीएमपर्यंत येऊन पोहचल्याचे बघून विद्यार्थ्यांनाही आनंद झाला. सर्वांत सुरक्षित असे सरकारी नियंत्रण असलेले जुने खाते म्हणून पोस्टाची ओळख विद्यार्थ्यांना पटली. अहिरराव यांनी पोस्टाचे विविध अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅपसंदर्भातही विद्यार्थ्यांना माहिती दिली. बीवायके महाविद्यालयाकडून हा अभ्यास दौरा पदवीच्या अखेरच्या वर्गात शिकणाºया विद्यार्थ्यांकरिता प्रत्यक्ष अभ्यास अहवाल तयार करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता.
‘याची देही याची डोळा’ अनुभव
टपाल बटवडा विभाग, स्पीड पोस्ट विभाग, फ्रॅन्किंग विभागाला भेटी देत विद्यार्थ्यांनी येथील प्रत्यक्ष कार्यानुभव ‘याची देही याची डोळा’ बघितले. तसेच पोस्टखाते काळानुरूप आधुनिक झाले असल्याचा प्रत्ययदेखील विद्यार्थ्यांना आला. येथील पत्रपेटी, टपाल डिलिव्हरी व्हॅन आणि एटीएमबघून विद्यार्थी अवाक् झाले.

Web Title: Students Learned 'Post Banking'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.